श्री महालक्ष्मीदेवी मंदिरातील मनकर्णिका कुंड भाविकांसाठी लवकर खुले करा ! – टी. राजासिंह, आमदार

कोल्हापूर, ५ मार्च (वार्ता.) – ‘मनकर्णिका कुंड’ हे प्राचीन काळापासूनच श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसरात असून लक्षावधी भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. दुर्दैवाने या कुंडाचे अस्तित्व पुसण्याचे काम तत्कालीन शासनकर्त्यांनी केले. हे कुंड खुले होण्यासाठी विविध संघटनांनी आंदोलन केले. या कुंडाच्या सुशोभिकरणाचे काम सध्या चालू असून ‘लवकरात लवकर मनकर्णिका कुंड भाविकांसाठी लवकर खुले करावे’, अशी मागणी भाग्यनगर येथील श्रीराम युवा सेनेचे संस्थापक-अध्यक्ष आमदार टी. राजासिंह यांनी केली. आमदार टी. राजासिंह  यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांसह या कुंडाची पहाणी केली. त्या प्रसंगी त्यांनी ही मागणी केली.

आमदार टी. राजासिंह यांनी श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतल्यावर मंदिर परिसरात चालू असलेल्या विविध विकासकामांची, तसेच कुंडाची पहाणी केली. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, ‘मराठा तितुका मेळवावा’चे श्री. योगेश केरकर, हिंदु एकता आंदोलनाचे श्री. दिलीप भिवटे, ऐश्वर्या मुनीश्वर यांसह अन्य मान्यवर उपस्थित  होते.

करवीर महात्म्यामध्ये या कुंडाचे वर्णन आले आहे. अगस्तीऋषि आणि त्यांची पत्नी लोपामुद्रा यांनी या कुंडात अनेक वेळा स्नान केले आहे. पूर्वी या तीर्थातील पवित्र पाणी श्री महालक्ष्मीदेवीच्या अभिषेकासाठी वापरले जात असे. ‘हे कुंड लवकरात लवकर खुले करून येणार्‍या भाविकांना त्याची पूर्ण माहिती होण्यासाठी मनकर्णिका कुंडावर त्याचे धार्मिक महत्त्व दर्शवणारे माहितीचे फलक आणि त्याची छायाचित्रे लावावीत’, अशी मागणी या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी यांनी केली.