सिंधुदुर्ग जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आदर्श होलिकोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

कुडाळ, सावंतवाडी आणि शिरोडा येथे करण्यात आले होळीचे पूजन

सावंतवाडी येथे होळीचे पूजन करतांना सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम
सावंतवाडी येथे होलिकोत्सव साजरा करतांना धर्माभिमानी हिंदू

सिंधुदुर्ग, २ मार्च (वार्ता.) – होळी म्हणजे दुष्प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत्प्रवृृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव ! वृक्षरूपी समिधा अग्नीत अर्पण करून त्या माध्यमातून वातावरणाची शुद्धी करणे, हा उदात्त भाव होळी साजरी करण्यामागे आहे. दुर्दैवाने सध्या या उत्सवाला विकृत स्वरूप प्राप्त झाले आहे. धर्मशास्त्र समजून घेऊन त्यानुसार सण-उत्सव साजरे केले, तर त्याचा आध्यात्मिक लाभ होतो. हे लक्षात घेऊन हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात सावंतवाडी, कुडाळ अन् शिरोडा (वेंगुर्ला) येथे आदर्श होलिकोत्सव साजरा करण्यात आला. यासह जिल्ह्यात गावागावांतही होलिकोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कुडाळ आणि सावंतवाडी येथे सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांची वंदनीय उपस्थिती लाभली होती.

कुडाळ, सावंतवाडी आणि शिरोडा येथे करण्यात आले होळीचे पूजन

सावंतवाडी – शहरातील श्री देव नारायण मंदिरासमोर होळीचे पूजन करण्यात आले. या वेळी कोलगाव येथील धर्मप्रेमी रवि भिसे यांनी पूजन केले आणि पौरोहित्य श्रीपाद काशाळीकर यांनी केले. त्यानंतर सद्गुरु सत्यवान कदम याच्या हस्ते पूजन करण्यात आले.

या वेळी सनातनचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे साधक, तसेच धर्माभिमानी हिंदू, असे १०० हून अधिक जण उपस्थित होते.

कुडाळ – शहरातील टपाल कार्यालयासमोरील मैदानात होळीचे पूजन करण्यात आले. या वेळी श्री. नामदेव सावंत यांनी पूजन केले आणि नेरूर येथील श्री. मंजुनाथ सुभाष फडके यांनी पौरोहित्य केले.

वेंगुर्ला – तालुक्यातील शिरोडा येथील विजय केरवाडा मैदानात धर्मप्रेमी श्री. भालचंद्र कुबल यांच्या हस्ते हाेळीचे पूजन करण्यात आले. श्री. हर्षद वझे यांनी याचे पौरोहित्य केले. या वेळी सनातनचे आणि हिंदु जनजागृती समितीचे साधक अन् धर्माभिमानी हिंदूंसह ८० हून अधिक जण उपस्थित होते.