भटक्या श्वानांच्या संदर्भात विविध उपाययोजना चालू ! – माधुरी मिसाळ, राज्यमंत्री

प्रतीकात्मक छायाचित्र

मुंबई, १ मार्च (वार्ता.) – मुंबईसह राज्यभरातील भटक्या श्वानांच्या संदर्भात विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. भटक्या श्वानांचा प्रश्न हा केवळ मुंबईपुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रातील आहे. त्यामुळे सर्वसमावेशक आणि कायदेशीर मार्गानेच या समस्येवर उपाययोजना केल्या जातील. भटक्या श्वानांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीत काही निर्देश दिले होते. त्यानुसार श्वानांचे स्थलांतर केंद्रांमध्ये करणे, तसेच स्वायत्त संस्थांच्या अखत्यारितील शैक्षणिक संस्था, मैदाने, रुग्णालये आदी ठिकाणी नोडल अधिकारी नेमण्याविषयी सांगण्यात आले. संबंधित संस्थांच्या दर्शनी भागावर नोडल अधिकार्‍याचे नाव लावण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तरात दिली.

‘शाळा आणि मैदान यांच्याभोवती संरक्षक भिंती (कंपाउंड) घालण्यात आल्या आहेत. शाळांमध्ये सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचसमवेत परिसरात कचरा साठू नये, यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाला निर्देश देण्यात आले आहेत’, असेही त्यांनी सांगितले.

विधान परिषदेचे सदस्य डॉ. मनीषा कायंदे, प्रवीण दरेकर, ज.मो. अभ्यंकर यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळा परिसरातील भटक्या श्वानांच्या संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, महानगरपालिकेकडून शाळा-महाविद्यालयांना भटक्या श्वानांविषयी कोणतेही काम सोपवण्याचा लेखी अथवा तोंडी आदेश देण्यात आलेला नाही. तथापि शाळांमधील शिक्षकांना श्वानदंश झाल्यास विद्यार्थ्यांनी कोणती प्राथमिक दक्षता घ्यावी, याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे प्रशिक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या जनजागृतीच्या संदर्भातील सूचनेनुसार देण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका 

ग्रामपंचायत स्तरावर भटक्या श्वानांच्या समस्येचे कसे निवारण करणार ? याविषयीही विधीमंडळात चर्चा व्हावी !