देहलीचे नाव ‘इंद्रप्रस्थ’ करण्याची भाजपच्या खासदारांची मागणी

भाजपचे खासदार प्रवीण खंडेलवाल

नवी देहली – केरळ राज्याचे नाव पालटून ‘केरळम् करण्याच्या प्रस्तावाला केंद्रशासनाने संमती दिल्यानंतर आता भाजपचे येथील खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी थेट देहलीचेच नाव पालटून इंद्रप्रस्थ करण्याची मागणी केली आहे. याआधीही भारतात कलकत्ता या शहराचे नाव पालटून कोलकाता, अलाहाबादचे प्रयागराज, मद्रासचे चेन्नई, बाँबेचे मुंबई असे नामकरण झालेले आहे. त्यामुळे देहलीचे नावही पालटण्यात येईल का ? हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

खासदार खंडेलवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी राजधानी देहलीचे नाव इंद्रप्रस्थ’ करावे, अशी मागणी केली आहे. ‘देहली हे नाव मध्यकालीन, तसेच वसाहतवादी कालखंडाचे आहे, तर इंद्रप्रस्थ या नावातून प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडते’, असे खंडेलवाल म्हणाले.

देहलीचा इतिहास

देहली नेहमीच देशाचे राजधानीचे शहर राहिलेले आहे. त्यामुळे या शहरावर नेहमीच वेगवेगळ्या राजा-महाराजांनी आक्रमणे केली. यात शहर अनेकदा उद्ध्वस्त झाले आहे. याआधी देहली शहराला दिल्लिका, दहली, तुघलकाबाद, शाहजहानाबाद, नवी दिल्ली या नावांनी ओळखले जायचे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे शहर ‘दिल्ली’ या नावाने ओळखले जाते.