Sri Lanka Blast Case : श्रीलंकेतील ईस्टर संडेच्या बाँबस्फोट प्रकरणात माजी गुप्तचर प्रमुखाला अटक

बाँबस्फोटासाठी साहाय्य केल्याचा आरोप

मेजर जनरल सुरेश सॅली

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेत वर्ष २०१९ च्या ‘ईस्टर संडे’च्या दिवशी चर्चमध्ये झालेल्या बाँबस्फोटांच्या संदर्भात माजी गुप्तचर प्रमुख मेजर जनरल सुरेश सॅली यांना अटक करण्यात आली आहे. सॅली यांच्यावर या स्फोटासाठी आतंकवाद्यांचे नियोजन आणि साहाय्य करण्यात भूमिका बजावल्याचा आरोप आहे. ब्रिटनची वृत्तवाहिनी ‘चॅनल ४’च्या एका माहितीपटात दावा करण्यात आला आहे की, राजपक्षे कुटुंबाला निवडणूक जिंकण्यास साहाय्य करण्यासाठी सॅली यांनी देशात भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी बाँबस्फोट घडवून आणले.

भारताने बाँबस्फोटांपूर्वी काही आठवडे आधी श्रीलंकेच्या गुप्तचर यंत्रणेला या संदर्भात माहिती दिली होती; परंतु तरीही बाँबस्फोट रोखण्यास आले नाहीत. या बाँबस्फोटांत २५० हून अधिक लोक मारले गेले होते. हे स्फोट स्थानिक जिहादी संघटनांनी, विशेषतः नॅशनल तौहीद जमात (एन्.टी.जे.) आणि जमियातुल मिल्लाथू इब्राहिम यांनी संयुक्तपणे केले होते.

स्फोटांच्या काळात श्रीलंकेत रानिल विक्रमसिंघे सरकार होते. त्यामुळे गुप्तचर यंत्रणेतील अपयशावरून विक्रमसिंघे यांच्यावर जोरदार टीका झाली होती.