Justice Sanjeev Prakash Sharma : राजस्थान उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींची जोधपूरमधील जिल्हा आणि सत्र न्यायालयाला आकस्मिक भेट !

८ न्यायाधीश अनुपस्थित आढळले !


जोधपूर (राजस्थान) – १७ फेब्रुवारी या दिवशी राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजीव प्रकाश शर्मा यांनी जोधपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाला आकस्मिक भेट दिली. या अचानक केलेल्या निरीक्षणाच्या वेळी ८ न्यायाधीश त्यांच्या आसनस्थानी (Dais) अनुपस्थित असल्याचे आढळले. यामध्ये जोधपूरचे जिल्हा आणि सत्र न्यायाधिशांचाही समावेश आहे. या सर्वांना तात्काळ ‘प्रतिक्षाधीन’ म्हणजेच ‘एपीओ’वर (‘अव्हेटिंग पोस्टिंग ऑर्डर्स’वर) ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.  ‘एपीओ’ ही एक प्रशासकीय स्थिती आहे, जिथे एखाद्या अधिकार्‍याला त्याच्या सध्याच्या पदावरून मुक्त केले जाते; परंतु त्याला नवीन नियुक्ती दिली जात नाही.

१. महानिबंधक चंचल मिश्रा यांनी हा आदेश जारी केला आहे. यापूर्वी २४ मे २०२५ या दिवशी ६ न्यायाधिशांना ‘एपीओ’वर ठेवण्यात आले होते.

२. ८ न्यायाधिशांना स्थानांतराचा आदेश मिळेपर्यंत जिल्हा मुख्यालयात उपस्थित रहाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ‘मुख्य न्यायाधिशांचा हा निर्णय न्यायालयीन शिस्तीला महत्त्व देणारा स्पष्ट संदेश आहे’, असे मानले जात आहे.

संपादकीय भूमिका

भारतात कोट्यवधी खटले प्रलंबित असतांना न्यायाधीशच सुनावणीसाठी उपस्थित नसतील, तर जलद गतीने न्याय मिळण्यासाठी जनतेने कुणाकडे आशेने पहायचे ?