शहरातील सुविधा ग्रामीण भागांत मिळाल्या, तर शेतीची प्रगती होईल ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री

भीमा कृषी प्रदर्शनात ४ दिवसांत सुमारे १८ कोटी रुपयांची उलाढाल

भीमा कृषी प्रदर्शनात बोलतांना भाजपचे खासदार धनंजय महाडिक (डावीकडे), तसेच मान्यवर

कोल्हापूर – शेतकर्‍यांना प्रगतशील करण्याचे काम सरकार करत आहे. शहरातील सुविधा ग्रामीण भागांत मिळाल्या, तर लोकांचे स्थलांतर थांबेल आणि शेतीची प्रगती होईल. खासदार धनंजय महाडिक यांनी कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकर्‍यांसाठी चांगले व्यासपीठ उभे केले आहे, असे गौरवोद्गार राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काढले. ते ‘मेरी वेदर’ मैदानात आयोजित भीमा कृषी प्रदर्शनाच्या सांगता समारंभ प्रसंगी बोलत होते. या प्रदर्शनात ४ दिवसांत सुमारे १८ कोटी रुपयांची उलाढाल झाली.

या प्रसंगी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. भाजपचे खासदार श्री. धनंजय महाडिक म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतीसाठी विविध योजना आणल्या जात आहेत. ‘किसान योजने’चा लाभ १२ कोटी शेतकर्‍यांना झाला आहे. गेली १८ वर्षे भीमा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकर्‍यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीची माहिती दिली जात आहे. यंदा गर्दीचे सर्व उच्चांक मोडले आहेत.’’  इचलकरंजीचे महापौर उदय धांतुडे, उपमहापौर अनिल डाळ्या, ‘बी न्यूज’चे कार्यकारी संचालक पृथ्वीराज महाडिक, भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांसह मान्यवरांची उपस्थिती होती.

भीमा कृषी प्रदर्शनात बोलतांना भाजपचे खासदार धनंजय महाडिक

हर्षवर्धन सपकाळ क्षमा मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना कोल्हापूर बंदी ! – धनंजय महाडिक, खासदार, भाजप

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानच्या संदर्भात जे वक्तव्य केले आहे त्याच्याशी स्थानिक काँग्रेसचे नेते आणि खासदार सहमत आहेत का ? जोपर्यंत हर्षवर्धन सपकाळ क्षमा मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना कोल्हापुरात बंदी असेल.