विविध ठिकाणच्या शिवमंदिरांत भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती

देवगड – सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५ फेब्रुवारी या दिवशी महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरा झाला. जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या शिवमंदिरांत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यानिमित्त मंदिरे विद्युत् रोषणाईने सजवण्यात आली होती, तसेच मंदिरांमध्ये धार्मिक विधी, तसेच भजन, कीर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. देवगड तालुक्यातील श्री कुणकेश्वरदेवाचा जत्रोत्सव हा जिल्ह्यातील सर्वांत मोठा जत्रोत्सव आहे. या जत्रोत्सवात राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार अजित गोगटे, आमदार दीपक केसरकर यांच्यासह अन्य राजकीय नेत्यांनी आणि लाखो भाविकांनी श्री देव कुणकेश्वराचे दर्शन घेतले. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे याही उपस्थित होत्या. या जत्रेची १७ फेब्रुवारी या दिवशी दर्श अमावास्येच्या योगावर पवित्र तीर्थस्थानाने आणि देवस्वार्यांच्या भेटीने सांगता होणार आहे.
जिल्ह्यात आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवीच्या जत्रोत्सवानंतर श्री देव कुणकेश्वराची जत्रा ही सर्वांत मोठी जत्रा असते. १४ फेब्रुवारीला मध्यरात्री १२ वाजल्यानंतर मंदिराचे पारंपरिक पुजारी, मानकरी यांनी पूजा केल्यानंतर विधीवत शासकीय पूजा करण्यात आली. त्यानंतर रात्री २.३० वाजल्यापासून भाविकांना श्री कुणकेश्वराचे मुखदर्शन देण्यास प्रारंभ करण्यात आला. जत्रोत्सवाला उपस्थित मान्यवरांचा देवस्थान समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
जिल्ह्यात कुडाळ येथील श्री कुडाळेश्वर मंदिर, नेरूर येथील श्री कलेश्वर मंदिर, खानोली येथील श्री रवळनाथ मंदिर, आंबोली येथील श्री हिरण्यकेशी मंदिर, गिर्ये (देवगड) येथील श्री रामेश्वर मंदिर, सावंतवाडी येथील श्री आत्मेश्वर मंदिर यांसह विविध ठिकाणच्या शिवमंदिरांत महाशिवरात्री उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग घेतला होता. जिल्हा प्रशासन, पोलीस, स्थानिक देवस्थान समित्या आणि ग्रामपंचायत यांनी केलेल्या नियोजनामुळे भाविकांना ठिकठिकाणच्या मंदिरात दर्शन घेणे सुलभ झाले. या निमित्ताने सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन अन् विक्री कक्ष विविध ठिकाणी लावण्यात आले होते. याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कुणकेश्वर हे केवळ धार्मिक स्थळ नसून कोकणाच्या सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग ! – पालकमंत्री नितेश राणे
दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देव कुणकेश्वराच्या जत्रेला अनेक वर्षांपासून मी नियमितपणे दर्शनासाठी येत आहे. श्री कुणकेश्वराचे दर्शन घेणे, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. माझ्या सार्वजनिक आणि वैयक्तिक जीवनात श्री देव कुणकेश्वराचा मोठा आशीर्वाद लाभला आहे. कुणकेश्वर हे केवळ धार्मिक स्थळ नसून कोकणाच्या सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग आहे. या भागाच्या विकासासाठी अधिकाधिक निधी शासनामार्फत उपलब्ध करून देण्यासाठी मी कटीबद्ध आहे आणि हे दायित्व निश्चितपणे मी पूर्ण करणार आहे, असे उद्गार पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. मंत्री राणे यांनी श्री कुणकेश्वर मंदिरात विधीवत पूजा-अर्चा केली. देवदर्शनानंतर उपस्थित भाविकांशी संवाद साधतांना मंत्री राणे बोलत होते. या वेळी स्थानिक पदाधिकारी, देवस्थान समितीचे सदस्य, अधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देवस्वार्यांची श्री देव कुणकेश्वराशी भेट

श्री देव कुणकेश्वराच्या जत्रोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे जत्रोत्सवानिमित्त विविध ठिकाणच्या देवस्वार्या श्री देव कुणकेश्वराच्या भेटीसाठी येत असतात. १५ फेब्रुवारीलाही काही देवस्वार्या श्री कुणकेश्वराच्या भेटीला आल्या होत्या.

थोडक्यात महत्त्वाचे (दि : १८.०७.२०२६)
जुन्नरमध्ये २७० किलो गोमांसासह ३ धर्मांधांना अटक, मुख्य आरोपी पसार
हिंदु धर्मातून ख्रिस्ती होणार्यांना अनुसूचित जमातीच्या सवलतींसाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
पाश्चात्त्य संगीत कार्यक्रमातील तरुणाचा मृत्यू अमली पदार्थ सेवनानेच
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बुरुजाच्या पायथ्याचे काही दगड कोसळले !
शिक्षण संचालनालयाकडून ‘एस्.आय.ओ.’च्या विरोधातील मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक मागे