उत्तराखंडमधील हृषिकेश आणि हरिद्वार येथील मंदिरांमध्ये पारंपरिक वेशभूषेत येण्याचे आवाहन

पारंपरिक वेशभूषेत न आल्यास बाहेरून दर्शन घेण्याची सूचना

हरिद्वार – हृषिकेश आणि हरिद्वार येथील मंदिरांच्या प्रवेशद्वारांवर स्त्री अन् पुरुष भाविकांना पारंपरिक वेशभूषेत मंदिरात यावे, तसेच निर्धारित वेशभूषेत नसल्यास बाहेरूनच दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अनेक मंदिरांमध्ये हा संदेश जवळपास समान शब्दांत दिसत असल्याने ही मोहीम व्यापक स्तरावर राबवली गेल्याचे संकेत मिळतात.

मंदिर हे आत्मरंजनाचे केंद्र ! – श्रीमहंत स्वामी रविंद्र पुरी महाराज, सचिव, महानिर्वाणी आखाडा

महानिर्वाणी आखाड्याचे सचिव आणि मंदिर व्यवस्थापक श्रीमहंत स्वामी रविंद्र पुरी महाराज यांनी याविषयी सांगितले की, मंदिर हे मनोरंजनाचे ठिकाण नाही. हे आत्मरंजनाचे स्थान आहे. येथे येण्यापूर्वी वेशभूषा, आचरण आणि भावना पवित्र असाव्यात. अनेकदा तरुण नकळत धार्मिक मर्यादेला न शोभणारे कपडे परिधान करतात आणि नंतर वाद निर्माण होतात. त्यामुळे पूर्वसूचना देणे अधिक योग्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
श्रीमहंत स्वामी रविंद्र पुरी महाराज यांनी सांगितले की, हा पहिलाच प्रसंग नाही. यापूर्वीही वेशभूषेविषयी जनजागृती मोहीम राबवली होती. ‘सरकारद्वारे संचालित मंदिर मंडळे आणि इतर आश्रम यांनीही याकडे लक्ष द्यावे’, असे त्यांनी आवाहन केले आहे. लोकांनी मर्यादांचे पालन केले नाही, तर धर्मही सुरक्षित रहाणार नाही. धर्माचा अर्थ धारण करणे, असा असून मर्यादा त्याचा अविभाज्य भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हृषिकेशमधील इस्कॉन मंदिरातही आवाहन

हृषिकेश येथील इस्कॉन मंदिराबाहेरही अशाच प्रकारचा फलक लावण्यात आला आहे. संदेशात नमूद आहे की, ‘आपणच आपल्या भारतीय संस्कृतीचे रक्षक आहोत. येथेही लहान कपडे, अर्धी पँट, मिनी स्कर्ट, नाईट सूट आणि फाटकी जीन्स घालून येणार्‍यांनी बाहेरूनच दर्शन घ्यावे’, असे सांगण्यात आले आहे. मंदिर व्यवस्थापनाचे म्हणणे आहे की, हा नियम सर्वांसाठी समान असेल.

‘हर की पौडी’ परिसरात अहिंदूंना प्रवेश निषिद्ध

‘श्री गंगा सभे’ने ‘हर की पौडी’ परिसरात १० हून अधिक ठिकाणी ‘अहिंदूंना प्रवेश निषिद्ध’ असे फलक लावले आहेत. ‘श्री गंगा सभे’चे अध्यक्ष नितीन गौतम यांच्या मते हा नवा नियम नसून वर्ष १९१६ च्या नगरपालिकेच्या उपनियमांनुसार आधीपासून अस्तित्वात असलेले प्रावधान आहे. वर्ष २०२७ च्या कुंभमेळ्यापूर्वी या नियमांची कडक कार्यवाही करण्याची मागणीही होत आहे.

व्हिडिओ बनवणे आणि ड्रोन्स यांवरही निर्बंध

‘हर की पौडी’ परिसरात चित्रपट गाण्यांवर ‘रिल्स’ (छोटे व्हिडिओ) बनवणे आणि अनुमतीविना ड्रोन उडवणे यांवर पूर्ण बंदीची सूचना देण्यात आली आहे. यामुळे धार्मिक वातावरण बाधित होते, असे संतांचे मत आहे. घाट परिसरात आता पोलीस आणि स्वयंसेवक अधिक सतर्क दिसत आहेत.

संपादकीय भूमिका

मंदिरांचे पावित्र्य राखण्यासाठी अशा सूचना देणार्‍या देवस्थान समित्यांचा स्तुत्य निर्णय  !