हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांनी हिंदुहितासाठी प्रभावी संघटनाद्वारे कायदेशीर लढाया लढणे, ही काळाची आवश्यकता ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन

गोवा येथे ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’चे संयोजक शिबिर

अधिवक्ता विष्णु शंकर जैन

फोंडा (गोवा) – श्रीराममंदिराच्या प्रकरणात मिळालेल्या विजयानंतर आता नव्या लढाईला खर्‍या अर्थाने प्रारंभ झाला आहे. यापुढे ज्ञानवापी, संभल, आदिनाथ मंदिर आदी प्रकरणांत न्यायालयीन लढा चालू आहे. श्रीराममंदिर प्रकरणात सर्वाेच्च न्यायालयाने दिलेला निर्णय विशेष आहे; परंतु देशात विविध प्रकरणांत न्यायालयाने दिलेले निर्णय एकांगी आहेत. सरकारीकरण झालेल्या मंदिरात आलेला पैसा हडपण्याचे प्रकार चालू आहेत. प्रत्येक ठिकाणच्या समस्या अधिक असल्याने एकाच अधिवक्त्याला प्रत्येक ठिकाणी लढणे शक्य होत नाही. हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांचे एक प्रभावी संघटन करून त्यांनी हिंदुहितासाठी कायदेशीर लढाया लढणे, ही काळाची आवश्यकता आहे, असे वक्तव्य सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी केले. ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या संयोजकांसाठी गोवा येथील सनातनच्या आश्रमात आयोजित शिबिराच्या वेळी अधिवक्ता जैन यांनी ही सूत्रे मांडली.

अखिल भारतीय हिंदु अधिवेशनात हिंदुत्वनिष्ठांनी एकत्रित येऊन कार्य करण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’ची स्थापना करण्यात आली होती. गेल्या २ वर्षांत ८ राज्यांत हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या माध्यमातून २० जिल्ह्यांत आंदोलने करण्यात आली. या माध्यमातून देशभरात ४०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय ठेवून एकत्रितपणे कार्य करीत आहेत. या दृष्टीने कार्य करणार्‍या हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या संयोजकांसाठी ३ दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन, देहली येथील अधिवक्त्या अमिता सचदेवा, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे सर्वश्री सुनील घनवट आणि वैभव आफळे व्यासपिठावर उपस्थित होते. या शिबिराच्या पहिल्या दिवशीच्या उद्बोधन सत्रात राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे कार्य करतांना आलेले अनुभव, करत असलेले प्रयत्न यांविषयी अधिवक्ता विष्णु शंकर जैन आणि अधिवक्त्या अमिता सचदेवा यांनी शिबिरार्थींना संबोधित केले.

या वेळी बोलतांना अधिवक्त्या अमिता सचदेवा म्हणाल्या की, द्वेषयुक्त भाषणाच्या (‘हेट स्पीच’च्या) विरोधात सर्वोच्य न्यायालयाने पोलिसांना स्वतःहू नोंद घेऊन कारवाई करण्यास सांगितले आहे; मात्र पोलीस केवळ हिंदुत्वनिष्ठांनाच लक्ष्य करत आहेत. हिंदूंवर सातत्याने होत असलेल्या विविध आघातांच्या विरोधात सातत्याने आणि नियोजनबद्ध कार्य केले पाहिजे.