आजपासून करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवीचा किरणोत्सव !

श्री महालक्ष्मीदेवीच्या किरटापर्यंत पोचलेले किरण (संग्रहित चित्र)

कोल्हापूर, ३० जानेवारी (वार्ता.) – प्रत्येक वर्षी जानेवारी-फेब्रुवारी आणि नोव्हेंबर मासात सूर्यास्ताच्या वेळी श्री महालक्ष्मीदेवीच्या संदर्भात एक विलक्षण घटना अनुभवण्यास येते, ती म्हणजे किरणोत्सवाची ! मागील वर्षी ९ ते ११ नोव्हेंबर या ३ दिवसांत हा किरणोत्सव झाल्यानंतर आता ३१ जानेवारी, १ आणि २ फेब्रुवारी या दिवशी हा किरणोत्सव होत आहे. यात पहिल्या दिवशी सूर्याची किरणे श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीच्या चरणांवर, दुसर्‍या दिवशी मूर्तीच्या छातीपर्यंत, तर तिसर्‍या दिवशी सूर्याची किरणे देवीच्या मूर्तीच्या पूर्ण अंगावर पडतात. हा सोहळा भक्तांसाठी एक अनुपम पर्वणी असते !