मंदिरांवर भगवा ध्वज फडकवू नये ! – काँग्रेसचे नेते रमानथ राय यांचे धर्मद्रोही विधान

भगव्या ध्वजाला राजकीय पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न !

काँग्रेसचे नेते रमानथ राय

उडुपी (कर्नाटक) : उडुपी येथील श्रीकृष्ण मठात साजरा केला जाणार्‍या ‘पर्याय’ या उत्सवामध्ये भगवा ध्वज फडकवल्याविषयी आक्षेप नोंदवत काँग्रेसच्या उडपी शाखेने जिल्हाधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. यानंतर आता काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री रमानथ राय यांनी ‘मंदिरांवर भगवा ध्वज फडकवू नये’ असे धर्मद्रोही विधान केले आहे. राय म्हणाले की, ‘मंदिरांमध्ये भगव्या ध्वजासह कोणताही ध्वज फडकवू नका; मग तो काँग्रेसचा ध्वज असो वा भगवा ध्वज. कोणत्याही राजकीयप्रेरित ध्वजाचा धिक्कार केला पाहिजे, असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

यासंदर्भात दक्षिण कन्नड जिल्ह्याचे खासदार ब्रिजेश चौटा यांनी ‘एक्स’वर पोस्ट प्रसारित करत टीका केली आहे. ते म्हणाले, ‘एस्.डी.पी.आय.’च्या पाठीशी उभे रहाणार्‍या काँग्रेसवाल्यांना हिंदूंनी काय करावे ? आणि काय करू नये ?, हे सांगण्याचा अधिकार नाही. तुमचा सल्ला हिंदूंना नको आहे. आमचे सण आणि परंपरा कशा साजर्‍या करायच्या हे तुमच्याकडून शिकण्याची आम्हाला आवश्यकता नाही.’

सामाजिक माध्यमांवरही रमानथ राय यांच्या विधानाविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे. ‘काँग्रेसला भगव्या ध्वजाचा इतका द्वेष का? ‘पाकिस्तान झिंदाबाद’ म्हणणार्‍यांना मोकळे सोडले जाते; पण हिंदूंनी मंदिरांच्या उत्सवात भगवा ध्वज फडकवू नये, असे म्हटले जाते. आपण नेमकी कोणत्या देशात आहोत ?’ अशा शब्दांत अनेकांनी त्यांचा संताप व्यक्त केला आहे.

काय आहे पर्याय उत्सव ?

‘पर्याय’ हा कर्नाटक राज्यातील उडुपी येथील श्रीकृष्ण मठात साजरा केला जाणारा एक अत्यंत महत्त्वाचा धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे. उडुपीमधील प्रमुख अष्ट मठांमध्ये (आठ मठांमध्ये) श्रीकृष्णाची पूजा करण्याचा अधिकार आणि मठाच्या प्रशासकीय दायित्वांचे हस्तांतरण ज्या उत्सवाद्वारे केले जाते, त्याला ‘पर्याय उत्सव’ म्हणतात.

संपादकीय भूमिका

  • उद्या काँग्रेसवाले ‘मंदिरेच नकोत’, असे म्हणायलाही कमी करणार नाहीत. असे होऊ द्यायचे नसेल, तर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही !
  • भगवा ध्वज हा हिंदु धर्मध्वज असून प्राचीन काळापासून त्याचा वापर होत आहे. अशा भगव्या ध्वजाला राजकीय पक्षाशी जोडणार्‍या काँग्रेसच्या नेत्याचे धर्माविषयीचे अज्ञानच उघड होते. काँग्रेसचा मुसलमानांच्या लांगूलचालनाचा प्रदीर्घ इतिहास पहाता, राय यांनी मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी हे विधान केले नसेल कशावरून ?