महाकुंभ मेळ्यात वार्तांकन करतांना ‘देवच सर्व करवून घेतो’, याची प्रचीती घेणारे श्री. यज्ञेश सावंत यांना आलेले अनुभव !

प्रयागराज येथे म्हणजे उत्तरप्रदेशात आणि त्यातही उत्तर भारतात दैनिक ‘सनातन प्रभात’चा वार्ताहर म्हणून सेवेसाठी जाण्याची ही पहिलीच वेळ होती. यामध्ये प्रत्यक्ष बातम्या, लेखांचे लिखाण यांच्यासह महत्त्वाची सेवा म्हणजे महाकुंभ मेळ्यातील विविध वैशिष्ट्यपूर्ण प्रसंगांचे व्हिडिओ, लघु मुलाखती घेणे, एखाद्या स्थानाचे महत्त्व विशद करणारे व्हिडिओ सिद्ध करणे, अशा अन्यही सेवा होत्या. महाकुंभ मेळ्याचा कालावधी मोठा असल्यामुळे १-२ दिवस नव्हे, तर महिनाभर हिंदी भाषेशी संपर्क आणि शुद्ध अन् चांगल्या हिंदीतून संवाद साधायचा होता. त्यामुळे ते एक प्रकारे आव्हान होते. तरी हिंदी विभागातील साधिका कु. निधी देशमुख यांनी हिंदी भाषेत संवाद साधण्याच्या दृष्टीने वार्ताहर सेवेसाठी जाणार्‍या साधकांचे ३ वर्ग घेतले होते. त्याचा या वेळच्या संपर्कात पुष्कळ लाभ झाला. ही सेवा करतांना ‘देवच सर्व करवून घेतो’, याची प्रचीती देणारे मला आलेले अनुभव येथे दिले आहेत.

श्री. यज्ञेश सावंत, सहसंपादक, दैनिक ‘सनातन प्रभात’, सनातन संकुल, देवद, पनवेल.

श्री. यज्ञेश सावंत

१. अक्षय्यवटाच्या ठिकाणी जवळून ध्वनीचित्रीकरण करण्यास अडचणी आल्याने निरुत्साह येणे; पण प्रार्थना करून सेवा चालू केल्यावर चांगला प्रतिसाद मिळणे !

प्रयागराज येथे अक्षय्यवट ज्या ठिकाणी आहे, तो ‘पुराना किल्ला’ परिसर हा सैन्याच्या अखत्यारित येतो. त्या वास्तूच्या बाहेर पोलीस चौकी आहे. त्यामुळे पोलिसांचा तेथे पहारा असतो. मी आणि सहसाधक श्री. प्रीतम नाचणकर यांनी अक्षय्यवटाच्या जवळ जाऊन ‘सनातन प्रभात’साठी ध्वनीचित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तेथे तैनात असलेल्या सैन्याधिकार्‍यांनी ‘तेथे वार्तांकनाची अनुमती केवळ त्यांच्या संपर्क केंद्रात रितसर अनुमती घेऊन, आवश्यक ती कागदपत्रे सादर करून आणि त्यांना द्यावीशी वाटली, तरच मिळते’, असे सांगितले. ‘एका आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या व्यतिरिक्त कुणालाच अद्याप येथे वार्तांकनाची अनुमती दिलेली नाही’, असे त्यांनी सांगितले. त्यांना ‘आम्ही पुष्कळ दूरवरून आलो आहोत’, असे सांगून किमान भ्रमणभाषद्वारे ध्वनीचित्रीकरण करू देण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी ‘वरिष्ठ अधिकार्‍यांना विचारून अन्य ठिकाणचे करून घ्या’, असे सांगितले; मात्र काही वेळाने अन्य एक अधिकारी आले आणि त्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना विचारून ‘येथे ध्वनीचित्रीकरण करू शकत नाही’, असे सांगितले. त्यामुळे जे काय करायचे, ते या वास्तूच्या पुष्कळ बाहेरून करायचे होते. तेव्हा एक जागा निवडून मी छायाचित्रकासमोर माहिती सांगण्यास प्रारंभ केला; मात्र आधी २ ठिकाणी अनुमती न मिळाल्याने थोडा निरुत्साह आला होता. त्यामुळे प्रार्थना करून ध्वनीचित्रीकरण चालू केले. ध्वनीचित्रीकरण चालू असतांना बाजूने जाणार्‍या एका भाविक महिलेने दूरूनच टाळ्या वाजवत ‘तुम्ही अक्षय्यवटाची चांगली माहिती सांगितली. धन्यवाद !’, असे सांगितले आणि ती निघून गेली. अन्यही अनेक लोक माहिती ऐकण्यासाठी काही वेळ थांबून नंतर निघून जात होते. त्यामुळे आत्मविश्वास वाढला आणि पहिला व्हिडिओ सिद्ध झाला.

यानंतर एकेका विषयावर व्हिडिओंची मालिकाच चालू झाली.

२. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भेटीची बातमी चुकणे; मात्र कोणतेही नियोजन न करता अचानक उपमुख्यमंत्र्यांशी भेट होणे !

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे महाकुंभ मेळ्यातील कामांचा आढावा घेण्यासाठी कुंभक्षेत्री आले होते; मात्र माझ्याकडून या बातमीचे वार्तांकन वेळेत दैनिक विभागात पाठवण्यात आले नाही. ‘बातमी कशी चुकली ?’, या विचारात रात्री झोपलो होतो. दुसर्‍या दिवशी ‘आणखी दूरवरच्या ठिकाणी मुख्यमंत्री येणार आहेत’, असे समजल्यावर ‘तेथे जाऊन चांगली बातमी मिळवूया’, या विचाराने बाहेर पडलो; मात्र त्यांना ‘झेड प्लस’ (उच्च दर्जाची) सुरक्षा असल्याने बातमीसाठी कार्यक्रमात जाणे सोडाच, आमच्यासह अन्य कुठल्याच पत्रकाराला त्यांच्या जवळही सुरक्षा यंत्रणांनी फिरकू दिले नाही, त्यामुळे तीही संधी गेली. अशाच विचारात सहसाधकासह पुन्हा आमच्या ‘सेक्टर’मध्ये जात असतांना रस्ता चुकलो. एका महाराजांच्या छावणीबाहेर प्रचंड पोलीस बंदोबस्त होता. तेथे काय आहे, ते बघण्यासाठी थेट छावणीत शिरलो. तेथील पोलिसांना विचारल्यावर ‘उपमुख्यमंत्री आले आहेत’, असे समजले. तेव्हा ते कुठे आहेत, ते शोधून अगदी त्यांच्या जवळ पोचून अन्य कुणीही पत्रकार तेथे नसल्यामुळे देवाच्या कृपेमुळे २ मिनिटांसाठी त्यांना प्रश्न विचारण्याची संधी मिळाली आणि त्यांचा अभिप्राय मिळू शकला. त्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची बातमी चुकल्याने झालेली हानी थोडीतरी भरून निघाल्यासारखे वाटले.

केंद्रीय चिकित्सालयाचे प्रमुख डॉ. मनोज कौशिक यांच्याशी जवळीक होणे !

प्रयागराज येथील केंद्रीय चिकित्सालयाचे प्रमुख डॉ. मनोज कौशिक यांची मुलाखत घेतांना श्री. यज्ञेश सावंत

केंद्रीय चिकित्सालयाचे प्रमुख डॉ. मनोज कौशिक यांच्याशी झालेल्या पहिल्या भेटीतच त्यांनी त्यांच्या वैद्यकीय व्यस्ततेतून वेळ काढून माहिती तर दिलीच; पण त्यानंतर त्यांना भ्रमणभाषवर संपर्क केल्यावर त्या त्या वेळी आवश्यक ती सर्व वैद्यकीय माहिती तात्काळ दिली. मुख्य म्हणजे पुष्कळ दिवसांचा परिचय असल्याप्रमाणे त्यांनी प्रत्येक वेळी अनौपचारिक बोलणेही केले. – श्री. यज्ञेश सावंत

३. रेल्वेची पत्रकार परिषद चुकणे; पण नंतर रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांना ही त्रुटी लक्षात आणून दिल्यावर त्यांनी कोणतेही आढेवेढे न घेता सविस्तर माहिती देणे !

मौनी अमावास्येच्या दिवशीची एकूणच भव्य व्यवस्थेविषयी रेल्वेची पत्रकार परिषद होती; मात्र सामाजिक माध्यमांमध्ये पाठवलेले पत्रकार परिषदेचे स्थळ पुष्कळ त्रोटक दिले होते. अनेक स्थानिक परिचित पत्रकार, सूचना अधिकारी यांना तो पत्ता विचारला; मात्र कुणीही नेमकेपणाने सांगू शकले नाही. महाकुंभमेळ्यातील अनेक सेक्टर, रेल्वेची कार्यालये पालथी घातली, तरी ठिकाण सापडेना. यात बराच वेळ निघून गेला आणि रेल्वेच्या जनसंपर्क प्रमुखांना विचारल्यावर त्यांनी सांगितलेले ठिकाण एवढे लांब होते की, ‘पत्रकार परिषद चुकणार’, असे वाटले आणि त्याप्रमाणे ती चुकलीही. तरी काहीतरी बातमी मिळवूया; म्हणून तेथे गेलो.

स्थानिक पत्रकार आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी निघून गेले होते. रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांच्या कक्षाबाहेरील कर्मचार्‍याला आम्ही आमची अडचण सांगितली. त्यांनी ‘काळजी करू नका, पत्रकार परिषद घेणार्‍या अधिकार्‍यांपेक्षा वरिष्ठ अधिकारी तुम्हाला भेटतील’, असे सांगून खूण करूनच एका केबिनमध्ये जायला सांगितले. केबिनमध्ये प्रवेश केल्यावर हिमांशू बडोनी या विभागीय व्यवस्थापकांसह अनेक अधिकारी तेथे बसल्याचे दिसले. आम्ही त्यांना म्हणालो, ‘‘तुमच्या अधिकार्‍यांनी पत्रकार परिषदेच्या स्थळाची अपूर्ण माहिती दिल्यामुळे आमची पत्रकार परिषद चुकली. अनेकांना हे ठिकाणही ठाऊक नाही. आम्ही लांबून आलो आहोत. आता आम्हाला माहिती मिळू शकेल का ?’’ वरिष्ठ व्यवस्थापकांनी ‘काही मिनिटे थांबा, मी माहिती देतो’, असे सांगून थोड्या वेळातच रेल्वेचे राज्यनिहाय नियोजन सांगितले. त्यानंतर ‘आणखी काही माहिती हवी, तर तीही सांगतो’, असे सांगितले. अशा प्रकारे इतरांपेक्षा वेगळी बातमी (इंग्रजीत ज्याला एक्सक्लुझिव्ह न्यूज म्हणतात) देवाच्या कृपेने मिळाली.

अशा काही अधिकार्‍यांमुळेच महाकुंभात ६० कोटींहून अधिक भाविकांनी सहभाग घेऊनही काही किरकोळ प्रसंग वगळता महाकुंभाचे आयोजन व्यवस्थित झाले होते.

४. वेणीमाधव मंदिराच्या पुजार्‍याने माहिती सांगण्यास नकार देणे आणि नंतर संकेतस्थळावरील माहिती पाहून सिद्ध केलेला व्हिडिओ पाहून त्यांनी तो मागून घेणे

प्रयागराज येथील प्रसिद्ध वेणीमाधव मंदिराच्या पुजार्‍याला आम्ही ‘मंदिराविषयी माहितीचा व्हिडिओ सिद्ध करत आहोत. तुम्ही माहिती सांगितली, तर चांगला व्हिडिओ सिद्ध होईल’, अशी विनंती केली; मात्र त्यांनी ‘मी कॅमेर्‍यासमोर माहिती देणार नाही. काय माहिती हवी, ती आमच्या संकेतस्थळावरून घ्या’, असे सांगून माहिती देण्यास नकार दिला.

त्यानंतर ‘मंदिरात गर्दी असल्याने गाभार्‍याच्या जवळून आम्हाला चित्रीकरण करण्यास अनुमती द्या’, अशी त्यांना विनंती केल्यावर त्यांनी ती मान्य केली. त्यानंतर मी अभ्यास करून मिळालेली माहिती, त्यांच्या संकेतस्थळावरील मंदिराविषयीची माहिती एकदा पाहून ती व्हिडिओद्वारे सांगण्यास प्रारंभ केल्यावर पुजारी स्वत: तेथे ‘मी काय माहिती सांगत आहे’, ते ऐकण्यासाठी आले. आमचे ध्वनीचित्रीकरण पूर्ण झाल्यावर ते म्हणाले, ‘‘आमच्या मंदिराची तुम्ही चांगली माहिती सांगितली, याचा व्हिडिओ सिद्ध झाल्यावर मलाही पाठवा, म्हणजे मी माझ्या परिचितांना पाठवीन.’’

५. मुंबई येथून वार्तांकनासाठी आल्याचा लोकांवर वेगळाच प्रभाव !

वार्तांकनासाठी अनेक संप्रदाय, संस्था, संघटना यांच्या प्रमुखांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांना ‘आम्ही वार्ताहर मुंबई, महाराष्ट्र येथून आलो आहोत’, हे ऐकून चांगले वाटायचे आणि ते त्वरित त्यांची छोटी मुलाखत (बाईट) देण्यास सिद्ध व्हायचे. अजूनही लोकांना मुंबईविषयी विशेष आकर्षण आहे. ‘मुंबईहून आले, म्हणजे ते गुणवत्तापूर्ण असणार’, असे त्यांना वाटायचे, हे त्यांच्या बोलण्यातून लक्षात आले.

६. इतर अनुभव

अ. ‘सनातन प्रभात’ या नावातच ‘सनातन’ असल्यामुळे आणि ‘सनातन’ हा शब्द हिंदु धर्म, संस्कृती यांच्या जवळचा असल्यामुळे हे नाव वाचून अनेक जण ‘वा सनातन’, असे उत्स्फूर्तपणे म्हणत.

आ. हिंदु राष्ट्राची राज्यघटना सिद्ध करण्यास पुढाकार घेणारे शांभवी पीठाधीश्वर पू. आनंद स्वरूप महाराज यांच्याकडे केव्हाही बातमीसाठी गेल्यास ते त्यांचे अन्य उपक्रम थांबवून माहिती देण्यासाठी सिद्ध होत आणि उत्साहाने माहिती देत.

इ. सनातन संस्थेच्या कक्षावर आलेल्या मथुरा येथील एका संप्रदायाच्या प्रमुख असलेल्या युवा साध्वींनी ‘महाकुंभमेळ्यासाठी वार्तांकन सेवेसाठी मुंबईहून आलो आहे’, असे समजल्यावर स्वत:हून प्रातिनिधीक सत्कार केला.

अशा प्रकारे विविध अनुभव सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या कृपेमुळे या वेळी आले. एवढ्या कडाक्याच्या थंडीत विविध ठिकाणे फिरणे, तेथील पाणी पिणे, वेगवेगळ्या ठिकाणी अल्पाहार आणि महाप्रसाद घेऊनही आरोग्य चांगले राहू शकले, याविषयी त्यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता !

श्री गुरुचरणार्पणमस्तु ।

– श्री. यज्ञेश सावंत, सनातन संकुल, देवद, पनवेल. (१९.४.२०२५)