Telangana Mass Killings STRAYDOGS : तेलंगाणातील गावांमध्ये आठवड्याभरात ५०० कुत्र्यांची हत्या

ग्रामपंचायत निवडणुकीत देण्यात आले होते कुत्र्यांपासून सुटका मिळवून देण्याचे आश्‍वासन !

कुत्र्यांना मारण्यासाठी विषारी इंजेक्शनचा वापर

भाग्यनगर (तेलंगाणा) : तेलंगाणामध्ये गेल्या एका आठवड्यात ५०० हून अधिक कुत्र्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या हत्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर झाल्या आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार या घटनांमध्ये पंचायत प्रतिनिधींची भूमिका समोर येत आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या वेळी काही उमेदवारांनी भटके कुत्रे आणि माकडे यांच्या समस्येवर तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले होते. निवडणूक जिंकल्यानंतर तीच आश्‍वासने कुत्र्यांना मारून पूर्ण केली जात आहेत, असे म्हटले जात आहे.

सरपंचांवर गुन्हा नोंद

कामारेड्डी जिल्ह्यातील पालवंचा मंडळातील भवानीपेट, पालवंचा, फरीदपेट, वाडी आणि बंदारामेश्‍वरपल्ली या ५ गावांमध्ये गेल्या२-३ दिवसांत सुमारे २०० भटक्या कुत्र्यांना मारण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी ५ सरपंचांसह ६ जणांवर गुन्हा नोंदवला आहे. यापूर्वी हनमकोंडा जिल्ह्यातील श्यामपेट आणि अरेपल्ली गावांमध्ये ६ जानेवारी ते ९ जानेवारी या काळात सुमारे ३०० भटक्या कुत्र्यांची हत्या झाल्याचे प्रकरण समोर आले होते. पोलिसांनी या संदर्भात २ महिला सरपंच आणि त्यांचे पती यांच्यासह ९ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला होता.

(चित्रावर क्लिक करा)

विषारी इंजेक्शन देऊन कुत्र्यांना मारल्याचा आरोप

सरपंचांवर आरोप आहे की, त्यांनी कुत्र्यांना मारण्यासाठी विषारी इंजेक्शनचा वापर केला. यासाठी एका व्यक्तीला ठेवले होते. मारलेल्या कुत्र्यांचे मृतदेह गावाबाहेर पुरण्यात आले होते. माहिती मिळाल्यावर पशुवैद्यकीय पथकांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन केले. मृत्यूचे नेमके कारण आणि वापरलेल्या विषाचा प्रकार शोधण्यासाठी नमुने गोळा करून प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

संपादकीय भूमिका

  • यावरून जनतेमध्ये भटक्या कुत्र्यांची समस्या किती गंभीर झाली आहे, हे लक्षात येते ! निवडणुकीत प्राथमिक सुविधा देण्याचे आश्‍वासन देणारे उमेदवार आता कुत्र्यांची समस्या सोडवण्यासाठी अशा प्रकारचे आश्‍वासन देत असतील, तर हे प्रशासनाचे अपयश आहे. ही स्थिती संपूर्ण देशात असल्याने यावर आता युद्धपातळीवर उपाय काढणे अत्यावश्यक ठरते !
  • तेलंगाणामध्ये काँग्रेसचे सरकार आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देहलीतील भटक्या कुत्र्यांना आश्रयगृहात ठेवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून संताप व्यक्त केला होता. आता त्यांच्या सरकारच्या राज्यातील कुत्र्यांना थेट ठार मारले जात आहे, यावर ते गप्प का आहेत ?