साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते डिजिटल स्मरणिकेचे वितरण !

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

सातारा – ‘पॉकेट बुक ते ई-बुक’ असा प्रवास करणार्‍या मराठी साहित्याच्या वाटचालीस अनुसरून ९९ व्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’ची स्मरणिका डिजिटल स्वरूपात उपलब्ध करण्यात आली आहे. ‘अटकेपार’ नावाच्या या स्मरणिकेच्या डिजिटल आवृतीचा वितरण सोहळा संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते पार पडला. या वेळी उपस्थितांसमक्ष मराठी साहित्य संमेलनाच्या ‘अटकेपार’ या स्मरणिकेची लिंक सर्वांना उपलब्ध केली गेली.

या वेळी स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, ‘‘अटकेपार’ स्मरणिका संगणक, भ्रमणसंगणक, भ्रमणभाष आणि अन्य साधने यांवर सुरक्षित ठेवता येईल अन् सोयीनुसार वाचता येईल. याविषयी संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी म्हणाले, ‘‘मराठी साहित्यविश्वाने तंत्रज्ञानातील पालट जलदगतीने आत्मसात केले आहेत. ‘ई-बुक’च्या स्वरूपात वाचक आज ‘स्क्रीन’वर वाचनाचा आनंद घेत आहेत, तसेच कसदार मराठी साहित्य ‘ऑडिओ बुक्स’मध्येही उपलब्ध झाले असून संमेलनाच्या ग्रंथप्रदर्शनात ई-बुक्स, ऑडिओ बुक्स यांचेही प्रदर्शन या वर्षी उभारण्यात आले होते. वाचनाची ही नवसंस्कृती झपाट्याने विकसित होत असल्यामुळे स्मरणिकेची डिजिटल आवृत्ती निर्माण करण्याची संकल्पना पुढे आली.

शतकपूर्व संमेलन ऐतिहासिक राजधानीच्या शहरात झाल्यामुळे साहित्यनगरीला ‘स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी’, असे नाव देण्यात आले. स्वराज्यविस्ताराच्या अभिमानास्पद कार्याला मानवंदना म्हणून स्मरणिकेलाही ‘अटकेपार’, असे नाव देण्यात आले.