शिवडी ते वरळी हा उन्नत मार्ग सप्टेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होईल ! – मंत्री उदय सामंत

तारांकित प्रश्नोउत्तरे

नागपूर, १३ डिसेंबर (वार्ता.) – शिवडी ते वरळी हा उन्नत मार्ग हा अटल सेतूला जोडणारा, वांद्रे वरळी सिलिंकला आणि मुंबई कोस्टल रस्त्याला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. विविध अनुमती मिळण्यास वेळ लागल्यामुळे हा रस्ता होण्यास विलंब झाला आहे. सध्या या रस्त्याचे ६४ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम सप्टेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करून रस्ता वाहतुकीस खुला केला जाईल, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. वरळी येथून जाणार्‍या शिवडी जोडरस्त्याच्या कामास गती मिळण्याविषयी, शिवसेना ठाकरे गटाचे सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री सामंत म्हणाले, ‘‘या रस्त्याच्या कामात १९ इमारती बाधित होत होत्या. त्यातील ३८६ कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न होता; परंतु रस्त्याच्या आराखड्यामध्ये पालट केल्यानंतर केवळ ८३ कुटुंबे बाधित होणार आहेत. त्यातील ४ कुटुंबांना रोख रक्कम दिली आहे. उर्वरित कुटुंबांना ‘म्हाडा’ किंवा ‘एम्.एम्.आर्.डी.ए.’कडे घरांची मागणी केली आहे. या रस्त्याच्या कामासाठी २ सहस्र २८३ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता दिलेली असून त्याचा कार्यारंभ आदेश १३ मे २०२१ या दिवशी निघाला आहे. त्याचा कालावधी ३६ महिन्यांचा होता.’’