Mumbai Climate Week : १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मुंबईत जागतिक स्तरावरील ‘मुंबई क्लायमेट वीक’ !

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

  • ३० हून अधिक देशांमधील अभ्यासक, पर्यावरणतज्ञ आणि धोरणकर्ते यांचा समावेश


मुंबई –
वातावरणातील पालट आणि पर्यावरण संवर्धन यांच्या क्षेत्रात भारताचे नेतृत्व अधोरेखित करणारी ‘मुंबई क्लायमेट वीक’ (मुंबई वातावरण सप्ताह) ही जागतिक स्तरावरील परिषद १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मुंबईत होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. हा महत्त्वाकांक्षी उपक्रम ‘प्रोजेक्ट मुंबई’ या संस्थेच्या संकल्पनेतून साकारला जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग’ अन् बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

विकसनशील देशांतील वातावरणात होणारा पालट, अन्न आणि ऊर्जा टंचाईच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. विकास आणि पर्यावरणाशी संबंधित कृती यांच्यात संतुलन साधण्यासाठी हा उपक्रम प्रभावी भूमिका बजावेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी व्यक्त केला.

हा कार्यक्रम ‘जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई’ येथे पार पडेल. या कार्यक्रमात नागरिकांना सहभागी होता यावे, यासाठी शहरभर विविध प्रदर्शने, कार्यशाळा, चित्रपट, कला, क्रीडा, आरोग्य आणि अध्यात्म यांच्याशी निगडीत उपक्रम अन् ‘क्लायमेट फूड फेस्टिव्हल’ यांसारखे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.