गोव्यातील ‘गोमंचली म्हशी’ला प्राण्यांच्या राष्ट्रीय सूचीत स्थान मिळणार !

पणजी, ८ ऑक्टोबर (वार्ता.) – गोव्यातील नम्र स्वभावाची; मात्र बलवान असलेली आणि वाकलेल्या विळ्यासारखी शिंगे असलेली ‘गोमंचली म्हैस’ हिला आता राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळणार आहे. गोव्याची ही अनोखी म्हैस राज्याची तिसरी स्थानिक जात म्हणून ओळखली जाणार आहे. यापूर्वी ‘आगोंदा डुक्कर’ आणि ‘श्‍वेत कपिला’ ही गायीची जात या २ स्थानिक प्रजातींना राष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. भारतभरात म्हशीच्या एकूण २१ विशेष जाती आहेत. यामध्ये हल्लीच मुर्रा (गुजरात), मांडा (ओडिशा) आणि पूर्णाथडी (महाराष्ट्र) या म्हशींच्या जातींचा समावेश झालेला आहे. या सूचीमध्ये आता लवकरच गोव्यातील ‘गोमंचली म्हैस’ समाविष्ट होणार आहे. गोव्यात मुर्रा जातीच्याही म्हशी आहेत; मात्र त्याची संख्या अल्प आहे. गोव्यात एकूण म्हशींपैकी गोमंचली म्हशींची संख्या अनुमाने ९० टक्के आहे.

भारतीय कृषी संशोधन परिषदेचे केंद्रीय किनारी कृषी संशोधन केंद्र (‘आय.सी.ए.आर्.’ – सी.सी.ए.आर्.आय. – ‘इंडियन कौन्सिल ऑफ अ‍ॅग्रीकल्चरल रिसर्च’ – ‘सेंट्रल कोस्टल अ‍ॅग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट’), जुने गोवे यांनी या म्हशीची जात ओळखून त्यासंबंधी दस्तऐवज सिद्ध करणासाठी विस्तृत क्षेत्रीय सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणाचे नेतृत्व अमिया राजन साहू यांनी केले. ही प्रकल्प योजना भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (‘आय.सी.ए.आर्’च्या) ‘राष्ट्रीय प्राणी अनुवांशिक संसाधन बुरो’, करनाल यांच्या निधीतून राबवण्यात आली. गोव्यात म्हशींची एकूण संख्या २७ सहस्र आहे आणि यामधील २५ सहस्र ६२५ म्हशी या शुद्ध जातीच्या आहेत. याविषयी अधिक माहिती देतांना ‘आय.सी.ए.आर्.-सी.सी.ए.आर्.आय.’चे संचालक तथा ‘प्राणी अनुवंशिकता आणि प्रजनन विभागा’चे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार म्हणाले, ‘‘गोमंचली म्हैस’ या शुद्ध जातीच्या म्हशीची संख्या समजण्यासाठी हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरले आहे. ‘गोमंचली म्हैस’ प्रतिदिन सरासरी ५ लिटर दूध देत असल्याने बहुतेक शेतकरी या जातीच्या म्हशीलाच प्राधान्य देतात. या म्हशीच्या जातीची नोंदणी झाल्यास तिची अनुवांशिक ओळख जतन करण्यास, तसेच शेतकर्‍यांना पर्यावरण आणि संसाधन संरक्षण यांवर आधारित रोजगार किंवा उपजीविका यांना आधार देण्यासाठी नवीन आर्थिक संधी उलपब्ध होण्यास साहाय्य होणार आहे.’’ राष्ट्रीय वनस्पती अनुवांशिक संसाधन मंडळ या संस्थेकडे आतापर्यंत २३० प्राण्यांच्या जातींची नोंदणी झालेली आहे आणि अनेक प्राण्यांच्या जातींवर संशोधन व्हायचे आहे. भारत सरकारने देशातील सर्व प्राण्यांच्या विशिष्ट जाती ओळखून त्यांची नोंदणी करण्याची मोहीम आरंभली आहे. केवळ म्हशीच्या अनेक जाती आहेत, ज्यांना अजूनही मान्यता मिळायची आहे.

‘गोमंचली म्हशी’ची वैशिष्ट्ये !

१. वाकलेल्या विळ्यासारख्या शिंगांमुळे दिसायला आकर्षक

२. उच्च फॅट (चरबी) असलेले दूध देणारी

३. लवकर प्रगल्भ होणारी जात

४. नम्र; पण कडक स्वभावाची

५. म्हशी काळसर ते करड्या रंगाच्या असतात आणि त्यांच्या तोंडावर पांढरे ठिपके असतात.