देशात अराजकता माजवण्याचा शहरी नक्षलवाद्यांचा डाव देशवासियांनी हाणून पाडावा ! – अधिवक्ता संदीप जाधव

जानवली येथे ‘जनसुरक्षा विधेयका’वर चर्चासत्र

अधिवक्ता संदीप जाधव

कणकवली – जनतेच्या मनात काही कारणांनी निर्माण झालेल्या असंतोषाचा लाभ उठवत शहरी (अर्बन) नक्षलवादी चळवळीत काम करणारे जनतेची माथी भडकवण्याचे काम करत आहेत. जनतेची माथी भडकवून देशात अराजकता माजवून सरकार पाडण्याचा त्यांचा डाव आहे. त्यांचा हा डाव देशवासियांनी हाणून पाडला पाहिजे. भारताची एकता आणि अखंडता यांना शहरी नक्षलवादापासून सर्वाधिक धोका आहे. अर्बन नक्षलवादाला रोखण्यासाठी महाराष्ट्र  सरकारने जनसुरक्षा विधेयक आणले आहे. महाराष्ट्रातील जनतेने या कायद्याचा प्रभावीपणे वापर करून अर्बन नक्षलवादाला आर्थिक रसद पुरवणारे आणि खतपाणी घालणारे यांना रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन अधिवक्ता संदीप जाधव यांनी केले.

जानवली येथील ‘नीलम कंट्रीसाईट’ हॉटेलमध्ये अधिवक्ता जाधव यांचे जनसुरक्षा विधेयकावर पत्रकारांसमवेत चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या वेळी जिल्हा पत्रकारसंघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, गणेश जेठे, कणकवली तालुका पत्रकारसंघाचे अध्यक्ष भगवान लोके, डॉ. मिलिंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.

अधिवक्ता जाधव पुढे म्हणाले …

१. देशाच्या पश्‍चिम प्रांतातून नक्षलवादाचा उदय झाला. ग्रामीण भागात नक्षलवादाचा प्रभाव होता. अलीकडच्या काळात शहरी नक्षलवाद वाढू लागला आहे. नक्षलवादी चळवळीत काम करणार्‍यांची माओवादी विचारसरणी आहे. ही विचारसरणी हिंसेचे समर्थन करते.

२. वर्ष २००४ ते २०१४ या काळात नक्षलवादाला खतपाणी आणि पाठबळ देण्याचे काम काँग्रेस सरकारने केले. त्यामुळे नक्षलवाद देशभरात फोफावला. वर्ष २०१४ नंतर केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आले. या सरकारने देशातील नक्षलवादाचा बीमोड करण्याचा निर्धार केला.

३. १० वर्षांत ग्रामीण भागातील नक्षलवाद अल्प झाला आहे. शहरी नक्षलवाद देशासाठी सर्वाधिक घातक आहे. नक्षलवादाला रोखण्यासाठी देशातील काही राज्यांनी जनसुरक्षा  कायदा लागू केला आहे. हा कायदा लागू झाल्यानंतर त्या राज्यांमध्ये अर्बन नक्षलवादाचे प्रमाण न्यून झाले.

४. गृहमंत्री अमित शहा यांनी वर्ष २०२६ पर्यंत देश नक्षलवादमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देशांतर्गत सुरक्षा व्यवस्था प्रामाणिकपणे काम करत आहे. केंद्र सरकारच्या विरोधात विरोधी पक्ष खोटे कथानक (फेक नॅरेटीव्ह) पसरवत आहे. जनतेने त्यांच्या प्रयत्नांना बळू पडू नये.

या कार्यक्रमाला पत्रकार मोठ्या संख्येने आदी उपस्थित होते.