मराठवाड्यातील ११ सहस्र ५०० लोकांचे स्थलांतर !

सांगली – मुसळधार पावसामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांतील काही भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे, जायकवाडी धरणाचे पाणी ओसंडून वाहू लागण्याची शक्यता असल्याने मराठवाडा भागातील काही जिल्ह्यांतील ११ सहस्र ५०० लोकांना सुरक्षित ठिकाणी हालवण्यात आले. धाराशिव जिल्ह्यात पुराच्या पाण्यात बुडाल्याने २ जणांचा मृत्यू झाला.
नाशिक येथील ७ सहस्र नागरिकांचे स्थलांतर !
नाशिक येथील गोदावरीच्या पुरामुळे ५ ते ७ सहस्र नागरिकांचे स्थलांतर झाले आहे. अंबड आणि घनसावंगी तालुक्यांतील गोदावरी नदीकाठी वसलेल्या ३२ गावांना जायकवाडी धरणातून सोडलेल्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे. काही लोक आवाहन करूनही रात्री गावाबाहेर पडले नाहीत. त्या सर्वांना पहाटे सुरक्षित ठिकाणी आणण्यात आले.
१. सीना नदीवरील जवळा-आळजापूर-करमाळा या रस्त्यावर पुलाशेजारी भगदाड पडले.
२. अहिल्यानगर-मनमाड महामार्गावर वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. पाऊस थांबल्याने तब्बल ३६ घंट्यांनंतर महामार्ग पूर्ववत् चालू झाला. येथे २ दुचाकीस्वार वाहून गेले होते.
३. बीड जिल्ह्यातील सोयाबीन, कांदा, उडीद, मूग आणि इतर खरीप पिकांचीही मोठी हानी झाली आहे.
४. करमाळा तालुक्यातील सीना नदीला पूर आल्याने आळजापूर येथील अनेक घरांत पाणी शिरले आहे. घरांची पुष्कळ मोठी हानी झाली.
५. समुद्रातील वातावरण मच्छीमारांसाठी प्रतिकूल असल्याने आश्रयासाठी देवगड बंदरात गुजरात राज्यातील अनुमाने १०० हून अधिक नौका आल्या आहेत.
६. राज्यात झालेल्या अतीवृष्टी आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तातडीने विधानसभेचे ‘विशेष अधिवेशन’ बोलावण्याची मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली आहे.
७. राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी राज्य सरकारला राज्यातील पूरग्रस्तांना कशा प्रकारे साहाय्य करावे, याविषयी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
८. सोलापूर जिल्ह्यातील पुराचे पाणी ओसरण्यास प्रारंभ झाला आहे, अशी माहिती मंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
९. मराठवाड्यात अतीवृष्टीत एकूण ६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर एकूण २१३ जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. यामध्ये धाराशिव जिल्ह्यात ८१, जालना जिल्ह्यात ४० जनावरे दगावली आहेत. दुधाळ जनावरांपैकी ९८ मोठी आणि ८६ लहान जनावरे, तर ओढकाम करणारी २५ मोठी आणि ७ लहान जनावरे दगावली आहेत.
इतिहासात प्रथमच जायकवाडीचे २७ दरवाजे उघडून ३.६ लाख क्युसेक विसर्ग !

जायकवाडी धरणाच्या निर्मितीनंतर प्रथमच २८ सप्टेंबरच्या रात्री १२ वाजण्याच्या सुमारास जायकवाडी धरणाचे २७ दरवाजे १० फूट उघडून ३ लाख ६ सहस्र ५४० क्युसेक वेगाने गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. नदीपात्राची क्षमता १ लाख क्युसेकची असल्याने गोदावरी नदीला महापूर आला आहे.
मुसळधार पावसामुळे तापी नदीच्या पाणीपातळीत वाढ !
नंदुरबार जिल्ह्यासह जळगाव जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने सारंगखेडा बॅरेजचे ५ दरवाजे आणि प्रकाशा बॅरेजचे ४ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले आहेत.
समुद्रात वादळ सदृश वातावरण; नौका किनार्याकडे परतल्या !
समुद्रात वादळ सदृश वातावरण निर्माण झाल्यानंतर स्थानिक नौकांसमवेत इतर नौकांनीही सुरक्षेच्या कारणास्तव सुरक्षित असलेल्या देवगड बंदराचा आश्रय घेतला. या वेळी वादळी वारे आणि पाऊस यामुळे यामध्ये स्थानिक नौकांसमवेत मालवण, तसेच गुजरात राज्यातील लोकांचाही समावेश आहे.
सोलापूरमधील पूर ओसरत आहे ! – जयकुमार गोरे, मंत्री
सोलापूर जिल्ह्यातील पुराचे पाणी ओसरण्यास प्रारंभ झाला आहे, अशी माहिती राज्याचे मंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पूरग्रस्त नागरिकांना युद्धपातळीवर साहाय्य पोचवण्यासाठी प्रशासन कार्यरत आहे. सध्या सीना नदीच्या पात्रातून १ लाख ५५ सहस्र क्यूसेकने पाण्याचा विसर्ग चालू आहे, तसेच धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांना सध्या ‘ग्रीन अलर्ट’ असल्याने पुराचा धोका टळला आहे. सोलापूरमधील या पुरामुळे अनुमाने १२ सहस्र ५०० कुटुंबांची मोठी हानी झाली असून ४५ सहस्रांहून अधिक कुटुंबांना याचा फटका बसला आहे.
राज्य सरकारने एकरी ५० सहस्र रुपयांचे साहाय्य शेतकर्यांना द्यावे ! – महादेव जानकर, अध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकार यांनी २९ सप्टेंबर या दिवशी परभणी जिल्ह्यात झालेल्या हानीची पहाणी केली. शेतकर्यांना विशेष पॅकेज द्यावे. एकरी ५० सहस्र रुपये साहाय्य करावे, अशी त्यांना राज्य सरकारकडे केली. सरकारने सर्व योजनाच्या माध्यमातून शेतकर्यांना साहाय्य करावे. राज्य सरकारने सतर्क रहात शेतकर्यांना साहाय्य करण्याकडे लक्ष द्यावे. राज्य सरकारने शेतकर्यांचा सातबारा पूर्णतः कोरा करावा, अशी मागणी महादेव जानकर यांनी केली.
बीड जिल्ह्यातील ३०७ गावांत धोक्याची चिन्हे !
गोदावरी नदीचे पाणी नांदेडच्या ३३७, बीड ३०६, जालना १७७, परभणी २८६, हिंगोली ७०, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील ४३ गावांमध्ये शिरून मोठी हानी होण्याची भीती व्यक्त होत आहे. गोदावरी नदीच्या पात्राजवळ ६ प्रमुख जिल्ह्यांची शहरे आहेत. महापुरामुळे या शहरांना जोडणारे ४५० महत्त्वाचे छोटे-मोठे रस्ते पाण्यात बुडून बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मराठवाड्यातील ७ पूल पाण्यात जाऊ शकतात.
आष्टी तालुक्यातील सीना आणि मेहेकरी नदीला पूर, १३ जणांची सुटका !
गेल्या २ दिवसांपासून बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात मुसळधार पाऊस पडल्याने तालुक्यातील सीना आणि मेहेकरी नद्यांना पूर आला आहे. नदीकाठच्या गावांना मोठा फटका बसला आहे. हिंगणी गावाजवळ काही शेतकरी आणि स्थानिक नागरिक पुरात अडकले होते, याची माहिती मिळताच तातडीने एन्.डी.आर्.एफ्.च्या पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाने बचावकार्य यशस्वीपणे राबवून पुरात अडकलेल्या १३ नागरिकांना सुखरूप बाहेर काढले. पूरस्थिती पहाता प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेची चेतावणी दिली आहे.
सरकार शेतकर्यांना साहाय्य करण्याच्या भूमिकेत ! – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
‘राज्यातील कोणताही शेतकरी हा पंचनाम्यापासून सुटू नये, यासाठी आम्ही जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांच्यासमवेत बैठक घेतली आहे. सरकार शेतकर्यांना साहाय्य करण्याच्या भूमिकेत आहे. नैसर्गिक आणि अनैसर्गिक परिस्थितीमुळे शेतकर्यांची मोठी हानी झाली आहे; मात्र कुठल्याही शेतकर्यांच्या भूमींचे पंचनामे सुटू नाही याची काळजी महाराष्ट्र सरकार घेत आहे’, असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
अहिल्यानगर येथील २५० हून अधिक नागरिकांचे स्थलांतर !
अहिल्यानगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या चोंडी गावाजवळून वाहणार्या सीना नदीनेही पात्र ओलांडले असून दिवसभरात २५० हून अधिक नागरिकांना प्रशासन, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी सुरक्षित स्थळी हलवले आहे. गावाच्या अनेक भागांत मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने हानीची तीव्रता मोठी आहे.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक