दूध भेसळखोरांना रोखण्यासाठी कठोर कायदा करू ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अजित पवार

पुणे – लहान मुलांपासून सर्वच जण दूध पितात आणि भेसळीने आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे गायी-म्हशींच्या गुणवत्तापूर्ण दूधाची विक्री करण्यावर भर देऊन ग्राहकांचा विश्वास संपादन करण्याची आवश्यकता आहे. राज्यात दूध भेसळखोरांना रोखण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये कठोर कायदा करण्यात येईल, असे आश्वासन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. ते २६ सप्टेंबर या दिवशी झालेल्या ‘पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघा’च्या ६६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.

‘कात्रज दूध संघा’च्या नवीन स्वयंचलित दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा प्रकल्प आणि मिनी मॉल, डेअरी पदार्थ रिबाईंडिंग (दूग्धजन्य पदार्थ बनवण्याची प्रक्रिया), ‘ईशान्वी हनी’ अन् ड्रोन इत्यादींचे डिजिटल पद्धतीने उद्घाटन करण्यात आले.

‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’चे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना निवेदन दिले. संकरित भाकड जनावरे, संकरित जर्सी गायीचे खाेंडे यांची खरेदी-विक्री बंद होऊन आठवडे बाजार बंद झालेत. दुधातील भेसळ रोखण्याविषयी चर्चा करण्यात आली. त्या वेळी पवार यांनी ‘दूध भेसळखोरांना रोखण्यासाठी कडक कायदा बनवू’, असे सांगितले.