भारतात आयकरदाते केवळ ५ टक्के, सर्वाधिक आयकर विवरण महाराष्ट्राचे !

मुंबई – भारतात आयकरदाते केवळ ५ टक्के असून त्यातही सर्वाधिक आयकर विवरण महाराष्ट्राचे असल्याचे समोर आले आहे.

वर्ष २०२४-२५ या आर्थिक वर्षात भारतात एकूण ७ कोटी ५५ लाख जणांनी वैयक्तिक आयकर जमा केला आहे. देशाची लोकसंख्या १४० कोटी इतकी धरली, तर एकूण लोकसंख्येच्या तुलनेत आयकरदाते केवळ ५ टक्के आहेत. असे असले, तरी आतापर्यंतच्या आयकरच्या तुलनेत यावर्षी जमा झालेली आयकरची रक्कम सर्वाधिक आहे. वर्ष २०२३-२४ मध्ये ७ कोटी २८ लाख जणांनी आयकर जमा केला होता. महाराष्ट्रात सर्वाधिक

१ कोटी २२ लाख जणांनी आयकर जमा केला आहे, तर महाराष्ट्राहून अधिक लोकसंख्या असलेल्या उत्तरप्रदेशामध्ये १ कोटी ८ सहस्र जणांनी आयकर जमा केला आहे. आयकर विभागाच्या संकेतस्थळावर याविषयीची माहिती उपलब्ध आहे.

याचा अर्थ देशातील केवळ ५ टक्के नागरिकच प्रत्यक्ष कर विवरण दाखवत आहेत. देशातील बहुतांश लोकसंख्या करकक्षेच्या बाहेर आहे. यामध्ये लहान मुले, वृद्ध, शेतकरी, अल्प उत्पन्न गट, तसेच करमुक्त उत्पन्न असलेले नागरिक यांचा समावेश आहे. ज्या व्यक्तींना लेखापरीक्षण (ऑडिट) बंधनकारक आहे, त्यांनी स्वत:चे आयकर विवरण ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सादर करणे आवश्यक असते. सामान्यपणे वैयक्तिक आयकर विवरण भरण्याचा अंतिम दिनांक ३१ जुलै असतो; मात्र या वर्षी प्रणालीतील पालट आणि तांत्रिक अडचणी यांमुळे वैयक्तिक आयकर भरण्याची समयमर्यादा १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत देण्यात आली होती. १५ सप्टेंबरच्या रात्री ११.५० वाजता आयकर विभागाने अचानक आणखी एक दिवस आयकर भरण्यासाठी वाढवला होता. करदाते आणि तज्ञांचे म्हणणे आहे की, केवळ एका दिवसाची वाढीव समयमर्यादा अपुरी आहे. अनेकांना अजूनही विवरण दाखल करता आलेले नाही. वैयक्तिक आयकर भरण्यासाठीची समयमर्यादा वाढवण्याची मागणी अनेकांकडून केली जात आहे.

सरकार आणि अर्थव्यवस्था यांच्यापुढे आव्हान !

प्रतिवर्षी देशात आयकर विवरण देणार्‍यांची संख्या वाढत आहे; पण अद्यापही हे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या तुलनेत अत्यल्प आहे. आयकर विवरण देण्याविषयीची जागरूकता वाढण्यासाठी सरकारकडून विविध मोहिमा राबवल्या जात आहेत. देशाच्या आर्थिक विकासासाठी करदात्यांची संख्या वाढवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात केवळ ५ टक्के नागरिकांनी आयकर विवरण दाखवणे, हे सरकार आणि अर्थव्यवस्था यांपुढील मोठे आव्हान आहे.

अनेकांनी केल्या तक्रारी !

आयकर संकेतस्थळाच्या तांत्रिक अडचणी, सावकाश चालणारे सर्व्हर, लॉगिन समस्या आणि विवरण भरतांना येणार्‍या त्रुटी, यांमुळे वैयक्तिक करदात्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला. संकेतस्थळ वापरण्यास सुलभ नसल्याची अनेकांनी तक्रारही केली. त्यामुळे विवरण वेळेत दाखल करणे कठीण झाले.