प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती राज्यात बनवल्या जात असून त्यांवर बंदी घालावी लागणार ! – आमदार प्रेमेंद्र शेट

पणजी, १४ सप्टेंबर (वार्ता.) – प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींवरील बंदी आणखी कठोर करण्याची आवश्यकता आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती राज्यात बनवल्या जात आहेत आणि त्यावरही बंदी घालावी लागणार आहे, असे आवाहन श्री गणेशमूर्तीकार तथा मयेचे भाजपचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी केले आहे.

ते पुढे म्हणाले, ‘‘अजूनही अनेक विसर्जनस्थळांवर पाण्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या न विरघळलेल्या श्री गणेशमूर्ती दिसत आहेत आणि ही त्या देवतेची विटंबना आहे. याला आळा घातला पाहिजे. सरकारने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती परराज्यांतून गोव्यात येऊ नयेत, यासाठी कठोरतेने पावले उचलली आणि यासाठी सरकार अभिनंदनास पात्र आहे; मात्र गोव्यात अनेक मूर्तीकार एखाद्या कारखान्याप्रमाणे श्री गणेशमूर्ती बनवण्यासाठी परराज्यातून कारागीर आणत असतात. या ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती बनवल्या जातात.’’

हिंदु धर्मामध्ये श्री गणेशमूर्ती मातीपासूनच बनवण्यास सांगितले आहे ! – राजेंद्र केरकर, प्रसिद्ध पर्यावरणतज्ञ

प्रसिद्ध पर्यावरणतज्ञ श्री. राजेंद्र केरकर म्हणाले, ‘‘पूर्वी गाळ आणि माती यांपासून श्री गणेशमूर्ती बनवत असत. ही एकप्रकारे मातीचीच पूजा करण्याची परंपरा आहे.

हिंदु धर्मामध्ये श्री गणेशमूर्ती मातीपासूनच बनवल्या पाहिजेत, असे अनेक वेळा सांगितले आहे; याचा विचार न करता हल्ली गोव्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती बनवल्या गेल्या किंवा परराज्यांतून गोव्यात आणल्या गेल्या.’’

चित्रशाळांमध्ये श्री गणेशमूर्तीची तपासणी करणे आवश्यक ! – दशरथ पेडणेकर, मूर्तीकार

मूर्तीकार श्री. दशरथ पेडणेकर म्हणाले, ‘‘गोव्यातील पारपंरिक मूर्तीकारही लोकांची फसवणूक करून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची विक्री करतात. श्री गणेशमूर्तींची चित्रशाळांमध्ये तपासणी होणे आवश्यक आहे. चित्रशाळांमधील मातीची आणि प्लास्टर ऑफ पॅरिसची श्री गणेशमूर्ती ओळखण्यास कुणाला जमत नसल्यास त्यांना साहाय्य करण्यास मी सिद्ध आहे.’’