
पणजी, ३० ऑगस्ट (वार्ता.) – सांतान, सांगे येथील ‘काले खनिज खाणपट्टा-४’ या लोह खनिज उत्खनन प्रकल्पाला केंद्रशासनाच्या पर्यावरण, वन आणि हवामान पालट मंत्रालयाने सशर्त पर्यावरण संमती दिली आहे. मंत्रालयाने संमती देतांना कठोर अटी घातल्या आहेत. ‘फोमेंतो रिसोर्सेस प्रा.लि.’ या आस्थापनाकडून हा प्रकल्प राबवला जाणार आहे. या निर्णयामुळे गोव्यात लोह खनिज उत्खननाला गती मिळणार आहे. या ठिकाणी प्रतिवर्ष ७ लाख ५० सहस्र टन खनिज उत्खनन करण्याची क्षमता आहे.
हा प्रकल्प कार्यान्वित करतांनाच सामाजिक बांधिलकी या नात्याने आस्थापन सांतान गावाला जलवाहिनीद्वारे विनामूल्य पाणीपुरवठा करणार आहे. स्थानिक युवकांसाठी प्रशिक्षण आणि इंटर्नशिप योजना राबवणार आहे. खाणी आणि वाहतूक मार्गांवर घनदाट वृक्षारोपण करणार आहे. कामगार आणि गावकरी यांच्यासाठी नियमित आरोग्य तपासणी आणि वैद्यकीय शिबिरे घेतली जाणार आहेत. त्याचप्रमाणे पर्यावरणीय उपाययोजना म्हणून प्रतिदिन प्रकल्पात वापरल्या जाणार्या पाण्याचा पुनर्वापर करणार आहे. प्रकल्पासाठी प्रतिदिन ३०० किलो लिटर पाण्याची आवश्यकता आहे, तर यांपैकी २५५ किलो लिटर पाण्याचा पुनर्वापर केला जाणार आहे. पावसाळ्यातील पाणी खड्ड्यात (८५ लाख घनमीटर क्षमतेने) साठवले जाणार आहे. वन्यजीव संवर्धन योजनेवर ७८ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. खनिज वाहतूक सावर्डे किंवा काप्शे जेटीपर्यंत केली जाणार आहे आणि अन्य २ पर्यायी मार्गही निश्चित करण्यात आले आहेत. वाहतुकीच्या वेळी माल रस्त्यावर पडू नये, यासाठी सर्वतोपरी काळजी घेणे, मालावर टारपोलीन (ताडपत्री) झाकणे, रस्त्यावर नियमितपणे पाण्याची फवारणी करणे आणि रस्त्यांच्या स्वच्छतेते काटेकोरपणे पालन करणे आदी योजना आखल्या जाणार आहेत.
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !
ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा