पुणे येथील ‘नवसाला पावणारा’ मोदी गणपति !

गणेशोत्सवाच्या निमित्ताने…..

‘मोदी गणपति’ हे नाव का पडले ?

या गणपतीला ‘मोदी’ नाव पडण्यामागेही एक गोष्ट आहे. गणपतीची सुंदर आणि स्वयंभू अशी मूर्ती पारशी गृहस्थ शेठजी मोदी यांच्याकडे सापडली. आता ज्या ठिकाणी मंदिर आहे, त्या ठिकाणी शेठजी मोदी यांची वैयक्तिक मोठी बाग होती. या बागेमध्ये गणरायाची मूर्ती सापडली. त्यामुळे ती ‘मोदी गणपति’ नावाने प्रचलित झाली. शेठजी मोदी यांचे पेशव्यांच्या कार्यालयात मोठे नाव होते. त्यांना अनेक भाषांचे ज्ञान असल्यामुळे शेठजी मोदी हे पेशवे आणि ब्रिटीश यांच्यामध्ये अनुवादक म्हणून कार्यरत होते. मोदींच्या बागेमध्ये गणरायाची मूर्ती सापडली असली, तरी तिची प्राणप्रतिष्ठा भट कुटुंबाने केली. पितळी देवघरामध्ये त्यांनी गणरायाची मूर्ती स्थापित केली. त्यामुळे मोदी गणपतीची मालकी आजही रत्नागिरीमधील भट कुटुंबाकडे आहे. भट कुटुंबाचे हे खासगी मंदिर आहे; मात्र मोदी गणपति जुन्या मंदिरांचा वारसा जपत आजही उभे आहे.

पुणे शहरातील नारायण पेठेमध्ये वसलेले मोदी गणपती मंदिर. मोदी गणपतीच्या नावाप्रमाणे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे. रत्नागिरीमधील भट कुटुंबाचे हे खासगी मंदिर असलेले ‘मोदी गणपति’ याची स्वतःची ओळख आजही जपून आहे.

मंदिराविषयीची माहिती

मोदी गणपति मंदिर साधारणतः २०० वर्षांपूर्वी बांधण्यात आले. १९ व्या शतकामध्ये मोदी गणपतीचे दोन मजली मंदिर बांधण्यात आले होते. चौकाच्या मधोमध असलेले हे मंदिर कौलारू आहे. मंदिराचा शांततामय परिसर आणि जुन्या आठवणी जपणारे मंदिराचे सभागृह आहे. मंदिरामध्ये प्रवेश करताच एका बाजूला मारुतीचे मंदिर आहे. यानंतर गणपतीचे मुख्य मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम लाकडी असून वाडासदृश्य हे मंदिर आहे. मंदिरात लाकडी महिरपी कमानी असून त्यावर सुबक असे नक्षीकाम करण्यात आलेले आहे. भाविकांना बसण्यासाठी सभागृहामध्ये मोठी जागा असून अष्टविनायकांची चित्रे, गणेशाचे विविध अवतार आणि श्लोक कोरण्यात आले आहेत. या चित्रांमध्ये गणेशाची अनेक रूपे आहेत.

मंदिरांच्या सभागृहामध्ये एक आडवा मंडप आहे. यामध्ये गणरायाचे वाहन आणि लाडू खात असलेला शेंदूरी मूषक लक्षवेधी आहे. गर्भगृहामध्ये पितळी मखरामध्ये गणरायाची मूर्ती विराजमान आहे. ही मूर्ती एक मीटर उंचीची, चतुर्भूज आणि उजव्या सोंडेची आहे. ही मूर्ती शेंदूरी असून तिचे डोळे लक्ष वेधून घेतात. मोदी गणपति हा ‘नवसाला पावणारा गणपति’ म्हणून विख्यात आहे.