श्री गणेशमूर्तीचे विसर्जन पंचगंगेतच करण्यावर हिंदुत्वनिष्ठ ठाम ! – हिंदु जनजागृती समितीची महापालिका प्रशासनासमवेत बैठक

कोल्हापूर महापालिका उपायुक्त शिल्पा दरेकर यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर, ११ ऑगस्ट (वार्ता.) – श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या संदर्भात प्रशासन जरी विविध शासन आदेश, तसेच न्यायालयाचे आदेश पुढे करत असले, तरी भाविकांनी विसर्जन करू नये, यांसाठी पंचगंगा नदीवर ‘बॅरिकेडस्’ घालावेत, असा आदेश कुठेही दिलेला नाही. वर्षभर विविध मार्गांनी होणार्‍या प्रदूषणाकडे डोळेझाक करते आणि केवळ गणेशोत्सवातच जागे होते. नदीत विसर्जन हा हिंदूंचा धार्मिक अधिकार असल्याने श्री गणेशमूर्तीचे विसर्जन पंचगंगा नदीतच करण्याच्या मागणीवर हिंदुत्वनिष्ठ ठाम आहेत, अशी भूमिका हिंदुत्वनिष्ठांनी प्रशासनासमवेत बोलावलेल्या बैठकीत मांडली. बैठकीच्या संदर्भात महापालिका प्रशासनाने हिंदु जनजागृती समितीला लेखी पत्र दिले होते. त्यावर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी उपायुक्त शिल्पा दरेकर, तसेच प्रदूषण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

कोल्हापूर महापालिका उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्याशी चर्चा करतांना हिंदुत्वनिष्ठ

या बैठकीसाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले आणि श्री. किशोर घाटगे, ‘सेवाव्रत प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. संभाजी(बंडा) साळोखे, हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, ‘बुधवार पेठे’चे सामाजिक कार्यकर्ते श्री. सुशील भांदिगरे, अखिल भारत हिंदु महासभेचे श्री. राजेंद्र तोरस्कर आणि श्री. विकास जाधव, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे तालुका समन्वयक श्री. शरद माळी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, ‘मराठा तितुका मेळावावा’चे श्री. योगेश केरकर, ‘महाराज प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी आणि श्री. आदित्य शास्त्री उपस्थित होते.

या वेळी श्री. उदय भोसले म्हणाले, ‘‘वर्षभर नाले, साखर कारखाने यांसह अनेक मार्गाने प्रदूषण होत असतांना महापालिका प्रशासन आणि प्रदूषण मंडळ कुठे असते ? महापालिका प्रशासनाचे नेहमी ‘आमचे प्रयत्न चालू आहेत’, असे ठोकळेबाज उत्तर असते. वर्षभर नदी प्रदूषित होत असतांना पुरोगामी कुठे असतात ? गणेशभक्त, नागरिक नदीत विसर्जन करण्यावर ठाम आहेत.’’ श्री. संभाजी साळुंखे (बंडा) म्हणाले, ‘‘श्री गणेशमूर्ती विसर्जनामुळे प्रदूषण वाढते, असा कुठला अहवाल प्रशासनाकडे आहे का ? वर्षातून एकदा येणार्‍या गणेशोत्सवात विसर्जनाच्या वेळीच प्रशासन का आडकाठी निर्माण करते ? गेली २ वर्षे भाविक पंचगंगा नदीतच विसर्जन करत असून ते यंदाही नदीतच विसर्जन करतील.’’ श्री. दीपक देसाई म्हणाले, ‘‘प्रशासन भाविकांचा धार्मिक अधिकार हिरावून घेऊने नदीवर बळजोरीने बॅरेकेडींग लावते; मात्र गणेशभक्तांचा उद्रेक होत असून त्यांनी दोन्ही वर्षे बॅरिकेड्स तोडून विसर्जन केले. प्रशासन असे का करते ? याचा अभ्यास प्रशासनाने केला आहे का ? उलट बॅरिकेडस् लावण्यासारखी कृती करून प्रशासन कोल्हापूर अशांत करत आहे.’’

श्री. सुशील भांदिगरे म्हणाले, ‘‘जुना बुधवार पेठेच्या वतीने आम्ही गेली अनेक वर्षे नदीच्या प्रदूषणाविषयी निवेदन, तसेच आंदोलन या मार्गे आवाज उठवत आहोत. अनेक वेळा दुधाळी नाला, तसेच विविध नाल्यांचे पाणी नदीत मिसळत असतांना आम्ही प्रशासनाच्या लक्षात आणून देऊनही प्रशासनाने कधीच कृती केली नाही.’’ या संदर्भात श्री. शिवानंद स्वामी म्हणाले, ‘‘प्रशासन प्रत्येक वेळी गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी प्रशासन न्यायालयाचे आदेश असल्याचे सांगते, तर अवैध भोग्यांच्या संदर्भात जो उच्च न्यायायालयाचा आदेश आहे, त्यावर आजपर्यंत प्रशासनाने कोणती कृती केली ? प्रदूषण मंडळ, पोलीस प्रशासन यांनी किती अनधिकृत भोंग्यावर कारवाई केली ? इचलकरंजीत नदीत रक्तमिश्रित पाणी मिसळते, तसेच कोल्हापूर शहरात विविध नाल्यांचे सतत मिसळते, त्यासाठी पालिका प्रशासन काहीच कृती करत नाही. राज्यात कुठेही बॅरिकेडस् घालून बंदी नसतांना केवळ कोल्हापूरात हा प्रयोग का ? तरी जनभावनेचा आदर करून प्रशासनाने विसर्जनास आडकाठी आणू नये. महापालिका प्रशासनाकडून कृत्रिम हौदात विसर्जन केलेल्या श्री गणेशमूर्तींचा अनादर केला जातो. या मूर्ती पाय देऊन उचलल्या जातात. तरी त्यांची कोणत्याही परिस्थितीत हेळसांड होऊ नये म्हणून योग्य ती दक्षता घ्यावी.’’

बैठक झाल्यावर महापालिकेत शिवसेनेचे आमदार आणि राज्य नियोजन महामंडळाचे अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांची हिंदुत्वनिष्ठांशी भेट झाली असता त्यांनी ‘यंदाही भाविक आणि गणेशभक्त श्री गणेशमूर्तीचे पंचगंगा नदीतच विसर्जन करतील’, असे सर्वांना आश्वस्त केले.