कर्नाटक : कारवार सरकारी गोशाळेच्या कामात लाखो रुपयांचा घोटाळा !

  • माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत मिळालेल्या माहितीतून भ्रष्ट प्रकार उघड

  • दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी

डावीकडून सर्वश्री सूर्यकांत कळस, अमित माळशेकर, संदीप आर्. गोकर्णकर, मोहन गौडा, डॉ. गजेंद्र नाईक आणि श्री. शरद

कारवार (कर्नाटक) – उत्तर कन्नड तालुक्यातील कणसगिरी गावात सर्वेक्षण क्रमांक ९५ मध्ये जिल्हा निर्मिती केंद्राच्या वतीने सरकारी गोशाळेचे बांधकाम करण्यात येत आहे. यात लाखो रुपयांचा अपव्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रकल्प व्यवस्थापक हर्ष शेट्टीगार आणि अभियंता कामराज यांनी त्यांच्या अधिकारक्षेत्राचा अपवापर करून अत्यंत निकृष्ट दर्जाचे बांधकाम करवून घेतले आहे. या अधिकार्‍यांवर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करत त्यांना पदावरून निलंबित करावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा यांनी येथे केली. २३ जुलैला येथील जिल्हा पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी ‘सनातन गोमाता चॅरिटेबल ट्रस्ट’चे अध्यक्ष श्री. संदीप आर्. गोकर्णकर, ‘सनातन राष्ट्रीय सेवा संघा’चे अध्यक्ष श्री. शरद, गोरक्षक आणि बजरंग दलाचे प्रमुख श्री. अमित माळशेकर आणि भगतसिंह सेनेचे अध्यक्ष श्री. सूर्यकांत हेसुद्धा उपस्थित होते.

श्री. गौडा यांनी मांडलेली महत्त्वपूर्ण सूत्रे !

१. बांधकामाची मंजुरी मिळवलीच नाही : निर्मिती केंद्राने हे बांधकाम जानेवारी २०२३ मध्ये चालू केले; परंतु यासाठी पशूसंवर्धन विभागाची तांत्रिक मंजुरी काम पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच ऑक्टोबर २०२४ मध्ये मिळवण्यात आली.

२. देयकांमध्ये तफावत : गोशाळेच्या बांधकामाचा अंदाजे खर्च ५० लाख रुपये असून आतापर्यंत झालेल्या बांधकामाची रक्कम ४२ लाख १२ सहस्र रुपये आहे; परंतु देयकांची रक्कम ३८ लाख ९० सहस्र रुपये दाखवण्यात आली आहे.

३. भिंती उभारण्यातही गौडबंगाल : भिंतींच्या बांधकामासाठी अनुमाने ५ सहस्र ३०० रुपयांच्या काँक्रीट ब्लॉक्सची आवश्यकता असून भिंतींचे काम पूर्ण झाले आहे; परंतु आम्हाला मिळालेल्या देयकांनुसार आतापर्यंत केवळ ३ सहस्र १२० रुपयांचे काँक्रीट ब्लॉक्स खरेदी करण्यात आले आहेत.

४. जवळपास दुप्पट लोखंडी सळ्या वापरल्या : लोखंडी सळ्यांचे प्रमाण अंदाजित पत्रकात २ सहस्र ६०१.०५ किलो आहे; परंतु प्राप्त देयकांनुसार ४ सहस्र २४८.१० किलो लोखंडी सळ्या खरेदी करण्यात आल्या.

५. अन्य वस्तूंच्या खरेदीतही अपव्यवहार : असाच प्रकार टाईल्स, पाईप्स, छत, चेन लिंक, इलेक्ट्रिक वायर, पेंट, प्लायवुड, सिमेंट या सर्व वस्तूंच्या खरेदी प्रक्रियेत झाला आहे.

संपादकीय भूमिका

कोणताही सरकारी प्रकल्प आला की, त्या पाठोपाठ भ्रष्टाचार हा ओघाने आलाच, हे समीकरणच आहे. याला उत्तरदायी असणार्‍यांना जोपर्यंत बडतर्फ करून त्यांची संपूर्ण मालमत्ता सरकारकडे जमा करून त्यांना आजन्म कारागृहात डांबत नाही, तोपर्यंत हे असेच चालू रहाणार ! त्यात काँग्रेस सत्तेवर असतांना काय कथा ?