सदनिकाधारकांना घराचे स्वामित्व मिळण्यासाठी ‘व्हर्टिकल सातबारा’ योजनेचे काम चालू !

पावसाळी अधिवेशनात विधेयक मांडले जाण्याची शक्यता

‘व्हर्टिकल सातबारा’ म्हणजे ?

‘व्हर्टिकल सातबारा’मुळे घर खरेदी करणार्‍यांना त्यांच्या जागेचा स्वतंत्र मालकी हक्क मिळेल आणि शासकीय कागदपत्रांतील गुंतागुंत न्यून होईल. तसे झाल्यास हा महाराष्ट्रातील मालमत्ता हक्क व्यवस्थेतील ऐतिहासिक पालट ठरेल !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – राज्यातील सदनिकाधारकांना त्यांच्या घराचे थेट स्वामित्व मिळवून देण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने ‘व्हर्टिकल सातबारा’ या योजनेवर काम चालू आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात या संदर्भातील विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे.

१. सध्या गाळेदार तत्वावरील इमारतींमध्ये रहातांना रहिवाशांना सातबारा उतारा मिळत नाही; मात्र ‘व्हर्टिकल सातबारा’ लागू झाल्यास प्रत्येक सदनिका मालकाला त्याच्या सदनिकेचा स्वतंत्र सातबारा उतारा मिळू शकेल.

२. घराच्या खरेदी-विक्रीसह बँक कर्ज व्यवहार, वारसा हक्क हस्तांतरण या गोष्टी सोप्या आणि पारदर्शक होतील.

शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात बहुमजली इमारती बांधल्या गेल्याने त्या जागेच्या मूळ सातबार्‍यावरच त्यांची नोंद होत असल्याने सदनिकाधारकांना थेट मालकी हक्क सिद्ध करणे अवघड जाते. हे लक्षात घेऊन महसूलमंत्र्यांनी या योजनेचा प्रस्ताव सिद्ध केला आहे.