नाशिक येथील सिंहस्थ कुंभपर्वात २५ कोटी भाविक येण्याची शक्यता ! – गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री

साधूग्रामसाठी कायमस्वरूपी भूमी अधिग्रहित करण्याचा प्रयत्न !

प्रतिकात्मक छायाचित्र

नाशिक – येथील कुंभपर्वासाठी २५ कोटी भाविक येण्याचा अंदाज असून त्यांची व्यवस्था करण्यात येईल. केवळ सिंहस्थातच नव्हे, तर गोदावरी बारमाही प्रवाही राहील, यासाठी शासन प्रयत्न करणार आहे. कुंभमेळ्यातील कामांसाठी १ रुपयाही निधी अल्प पडू देणार नाही.

कुंभपर्वात २ सहस्र ५०० सीसीटीव्ही कॅमेर्‍यांद्वारे गर्दीचे व्यवस्थापन करण्यात येईल. ५ लाख वाहनांची व्यवस्था असेल, असे वाहनतळ बनवण्यात येईल. नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे येणार्‍या साधूंसाठी शासनाकडून कायमस्वरूपी भूमी अधिग्रहित करण्यात येणार आहे, अशी माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली. एका दैनिकाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी साधू-संत, आधुनिक वैद्य, पुरोहित आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

गिरीश महाजन

कुंभपर्वाविषयी कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देतांना मंत्री गिरीश महाजन म्हणाले,

१. खासगी विमानांनी येणार्‍या भाविकांसाठी ओझर, शिर्डी आणि छत्रपती संभाजीनगर येथे सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. हवाई वाहतुकीच्या नकाशावर नाशिकचे महत्त्व अधोरेखित होईल. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीच्या सुविधा नाशिकच्या विकासात कायमस्वरूपी योगदान देतील.

२. रेल्वे स्थानके, देवळाली कॅम्प आणि ओढा विकसित करण्यात येणार आहेत. नाशिक आणि शिर्डी येथील विमानतळांवर सुविधा वाढवण्यात येतील.

३. साधूग्रामविषयी निर्णय झाल्यावर भूमीमालक शेतकर्‍यांना योग्य मोबदला देण्यात येईल.

४. त्र्यंबकेश्वर-नाशिक या रस्त्याचे ६ पदरी क्राँकिटीकरण करण्यात येईल. शहराला जोडणार्‍या विविध मार्गांवरील रस्त्यांची लांबीही वाढवण्यात येणार आहे. चारपदरी रस्ते सहापदरी आणि सहापदरी रस्ते आठपदरी करण्यात येतील.

५. अमृतस्नान (शाहीस्नान) आणि पर्वस्नान यांचे साधू-महंतांच्या सूचनांनुसार नियोजन केले जाईल.

६. त्र्यंबकेश्वर-नाशिकचे ‘ब्रँडिंग’ (विशेष ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न) करण्यासाठी १ विशेष लोगो सिद्ध करावा, तसेच राज्यभरात शासनासह सर्व खासगी संस्थांनी सिंहस्थपर्वाचे ‘ब्रँडिंग’ करावे. कुंभपर्वाच्या माध्यमातून नाशिक जागतिक स्तरावर तर पोचेल; पण नाशिकचे धार्मिक पर्यटनस्थान म्हणून महत्त्व अधोरेखित होईल.

७. जिल्ह्यातील सर्वच महत्त्वाच्या रस्त्यांवर २ लेन वाढवण्यात येणार आहेत.

८. भाविकांना गोदावरीत स्नान करता येण्यासाठी नदीत निर्मळ आणि स्वच्छ पाणी उपलब्ध होण्यासाठी, तसेच गोदावरीच्या प्रदूषणाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा, यासाठी राज्यशासनाने विशेष नियोजन केले आहे. गंगापूर धरणासह परिसरातील अन्य धरणांतून पाणी पंपिंग करून गोदावरी नदीत सोडून ती बारमाही प्रवाहित ठेवण्यात येणार आहे.

९. शासकीय आणि खासगी क्षेत्रातील आधुनिक वैद्यांना शासनाने कुंभपर्वासाठठी सामावून घेत त्यांच्या साहाय्याने आरोग्य सुविधांवर लक्ष केंद्रित करणार आहे.

१०. शहरातील प्रत्येक घटक आणि सर्व संस्था यांना सोहळ्यात प्रशासन सहभागी करून घेईल.

११. सर्वच वैद्यकीय सुविधा, उपचार एका रुग्णालयात उपलब्ध करून दिल्यास गैरसोय होऊ शकते. यासाठी शहरातील सर्व रुग्णालयांचा आढावा घेत त्यातील सुविधा, खाटांची उपलब्धता यांचा विचार करून भाविकांसाठी रुग्णालयाचे वर्गीकरण करण्यात येईल.

१२. वर्ष २००३ च्या कुंभपर्वासाठी दिलेल्या जागेचे पैसे अद्याप भूमीमालकांना पैसे मिळालेले नाहीत; मात्र यंदा असे होणार नाही.

१३. त्र्यंबकेश्वर ‘अ’ दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे, तसेच नाशिकलाही विशेष धार्मिक महत्त्व आहे. याचा विचार करता साधू-महंतांसह भाविकांच्या मांस आणि मद्य विक्री बंद करण्याच्या मागणीचा विचार केला जाईल.

१४. सिंहस्थपर्वाच्या वेळी येणार्‍या भाविकांची संख्या मोठी असते. भाविकांकडून निवासाविषयी विचारणा होते. उपाहारगृहाच्या वाढलेल्या शुल्कामुळे भाविकांना मोठी आर्थिक झळ बसते. ही आर्थिक लूट थांबवण्यासाठी शहरातील धर्मादाय आयुक्तांकडे नोंद असलेल्या सर्व धर्मशाळांचे अधिग्रहण करण्यात येईल. भाविकांची लूट टाळण्यासाठी रिकामी घरे (फ्लॅट) देण्याच्या प्रस्तावाचा सरकार विचार करील.

१५. भाविकांचे निवास आणि भोजन यांची व्यवस्था व्हावी, या उद्देशाने कॉफी कॅफे, तसेच उपाहारगृह उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विचार केला जाईल.