
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा या ठिकाणी झालेल्या लोकलगाडीतील अपघातामुळे महाराष्ट्र सरकारसह रेल्वे खाते खडबडून जागे झाले आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या जिल्ह्यांतून धावणार्या लोकल गाड्यांतील प्रवाशांची दिवसागणिक वाढत जाणारी संख्या सरकारपुढील मोठे आव्हान ठरू लागले आहे. रोजगाराच्या आशेने समस्त देशभरातून या शहरांकडे येणारे बेरोजगारांचे लोंढे, या शहरांतील वाढती लोकसंख्या यांमुळे सध्याची वाहतुकीची साधने पुष्कळ अपुरी पडत आहेत. लोकल रेल्वेसेवा ही तुलनेने स्वस्त आणि जलद असल्याने, तसेच तिन्ही जिल्ह्यांत या सेवेचे जाळे पसरलेले असल्याने लोकांकडून दैनंदिन प्रवासासाठी या मार्गालाच अधिक पसंती दिली जात आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने दोन गाड्यांतील कालावधी न्यून केला, लोकलगाड्यांची संख्या वाढवली, गाड्यांच्या फेर्या वाढवल्या, १२ डब्यांच्या लोकलगाड्या १५ डब्यांच्या केल्या, जलद मार्गाचे थांबे वाढवले; मात्र ज्या तुलनेत प्रवाशांची संख्या वाढत आहे, त्या तुलनेने हे उपायसुद्धा निष्फळ ठरत आहेत. कार्यालयीन वेळेत रेल्वेगाड्या दुथडी भरून वाहत असतात.

कितीतरी जण जीव मुठीत घेऊन रेल्वेच्या दाराबाहेर लटकत प्रवास करतात, ज्यामध्ये स्त्रियासुद्धा मोठ्या प्रमाणात असतात. मुंब्रा येथे घडलेला अपघात हा देशभर गाजला असला, तरी लोकल रेल्वेमार्गावर गर्दीच्या वेळेत प्रतिदिन कितीतरी जण रेल्वे गाड्यांतून पडून मरण पावतात, तर कित्येक जण कायमचे जायबंदी होतात. रेल्वेच्या दारावर प्रवाशांनी लटकून प्रवास करू नये आणि पुन्हा मुंब्य्रासारखा अपघात घडू नये, यांसाठी राज्य सरकारने भाडेवाढ न करता सर्वच लोकलगाड्या वातानुकूलित करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली. मुंबई, ठाण्यातील रेल्वे मार्गांवर सध्या धावणार्या वातानुकूलित गाड्या त्यांच्या नियोजित वेळेत रेल्वेस्थानकांवर येत नाहीत. ट्रेनमधील वातानूकुलीन यंत्रांचे दारात गळणारे पाणी, गर्दीच्या वेळेत स्वयंचलित उघड बंद होणार्या दरवाजांना लागणारा अधिकचा कालावधी यांमुळे या गाड्यांच्या वेळापत्रकावर प्रतिदिन परिणाम होतो. त्यामुळे प्रतिदिनच काही गाड्या रहित कराव्या लागतात. त्याचा परिणाम नेहमीच्या लोकलगाड्यांवर होतो. लोकलने प्रवास करणार्या प्रवाशांची संख्या पहाता केवढी भीषण परिस्थिती उद्भवेल, याची कल्पनाही करता येत नाही ! आतापर्यंत गाडीत महिलांवर अत्याचार होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. दारे बंद असणार्या गाड्यांत अशा घटना वाढू शकतात. गाडीत कुणी चाकू किंवा अन्य शस्त्र घेऊन चढला, तरी आतील लोकांची तारांबळ उडेल. गर्दूल्ले, दारूडे, भिकारीही गोंधळ घालू शकतात. त्यामुळे तूर्तास तरी सर्व गाड्या वातानुकूलित करणे कितपत श्रेयस्कर आहे, याचा विचार करावा लागेल !
– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई.
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वीरमरण आलेल्या ६ भारतीय सैनिकांची नावे प्रथमच जाहीर !
महाराष्ट्रात ८ प्रमुख शहरांमध्ये अत्याधुनिक मराठी भाषा विकास केंद्र उभारणार !
‘म्युझिक कॉन्सर्ट’मध्ये यापुढे दारूला अनुमती नाही ! – योगेश कदम, गृहराज्यमंत्री
Data Centers : अमर्याद ‘डेटा सेंटर्स’मुळे उद्भवणार्या जलसंकटाविषयी विधान परिषदेत पडसाद !