कोरोनाकाळापासून पुणे विभागाने ‘एस्टी’च्या १०७ फेर्‍या बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय !

पुणे – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे पुणे विभागात एकूण १४ आगार असून ८५० बसगाड्या आहेत. पुणे विभागात बसगाड्यांच्या प्रतिदिन ३ सहस्र ४०० फेर्‍या होतात. विभागाचे प्रतिदिन उत्पन्न सवलतींविना १.२५ कोटी तर सवलतींसह २ कोटी रूपये आहे. कोरोना महामारी नंतर प्रवाशांचा घटलेला प्रतिसाद आणि बसगाड्यांची कमी झालेली संख्या यामुळे पुणे विभागात बसगाड्यांच्या १०७ फेर्‍या बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे एस्टी वेळेत न मिळणे, एस्टीसाठी वाट पहावी लागणे, बसायला जागा न मिळणे, गर्दी असलेल्या बसमधून प्रवास करणे, खाजगी वाहनातून धोकादायक स्थितीत प्रवास करणे, अशा त्रासाला प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रतिदिन प्रवास करणार्‍या सरासरी १ लाख ६० सहस्र प्रवाशांची गैरसोय होत आहे. बंद झालेल्या फेर्‍यांमध्ये शटलसेवा, मध्यम पल्ल्याच्या, लांब पल्ल्याच्या आणि विनावाहक बससेवांचा समावेश आहे.

संपादकीय भूमिका

परिवहन मंडळाने त्रुटी सुधारून वेळेत, नियमित आणि वारंवार बस सेवा उपलब्ध करून दिल्यास प्रवाशांची गैरसोय टळेल.