बनावट ‘अॅप’द्वारे भाविकांची फसवणूक !

शनीशिंगणापूर (जिल्हा अहिल्यानगर) – मागील महिन्यात सामाजिक माध्यमावर अनधिकृत भ्रमणभाष ‘अॅप’द्वारे अनुमाने ४० ते ५० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त केला होता. देवस्थानाच्या कर्मचार्यांनी ‘अॅप’च्या माध्यमातून ऑनलाईन पूजा, दर्शन आणि तेल अर्पणाच्या माध्यमातून भाविकांकडून पैसे घेतले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या मंदिरामध्ये झालेल्या पूर्वीच्या घोटाळ्याची प्रकरणे चर्चेत येत आहेत. (एवढा मोठा घोटाळा होत असल्याचे कुणाला लक्षात आले नाही का ? हे मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम नाही का ? – संपादक)
‘अॅप’च्या घोटाळ्याविषयी देवस्थानाचे माजी विश्वस्त डॉ. वैभव शेटे, काँग्रेसचे संभाजी माळवदे, ‘शनीसाई प्रतिष्ठान’चे अध्यक्ष विशाल सुरपुरिया, भाजप युवा मोर्चाचे ऋषिकेश शेटे यांनी हे प्रकरण उचलून धरले. देवस्थान विश्वस्त मंडळाच्या सूचनेनुसार सुरक्षाधिकारी गोरक्षनाथ दरंदले यांनी अहिल्यानगर येथील सायबर शाखेत लेखी तक्रार देऊन ‘अॅप’च्या ३ अनधिकृत आस्थापनांची नावे, त्याचे मालक आणि त्यांचे भ्रमणभाष क्रमांकही दिले आहेत.
देवस्थानाकडून तक्रार प्रविष्ट झाल्यानंतर यज्ञमंडप, शनीचौथरा आणि उदासी महाराज मठात होत असलेल्या हालचालींवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. देवस्थानामधील बनावट अॅप घोटाळ्यासह बर्फी घोटाळा, तेल घोटाळा, देवस्थानाच्या प्रसादालयातील घोटाळा, ‘लॉजिंग’ आणि ‘गेस्ट हाऊस’चा (निवारागृह आणि विश्रामगृह) घोटाळा यांविषयी लोकांमध्ये चर्चा होतांना दिसून येत आहे. याविषयी धर्मादाय आयुक्त कार्यालय आणि जिल्हा पोलीस प्रशासनाकडे तक्रारी केल्यानंतरही कारवाई होतांना दिसत नाही, असा सूर ऐकावयास मिळत आहे.
शनैश्वर देवस्थानाच्या नावाने खोट्या आणि बनावट अॅपची निर्मिती करून आर्थिक लूट अन् अपहार करणार्या देवस्थानामधील कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकार्यांची सखोल चौकशी करावी. सर्वांच्या संपत्तीची आणि मालमत्तेची चौकशी करून अॅप निर्मितीमध्ये दोषी आढळलेल्या व्यक्तींच्या विरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार ! – विशाल सुरपुरिया, शनीसाई प्रतिष्ठान
‘देवस्थान ट्रस्ट’ची कोणत्याही प्रकारची अनुमती न घेता ८ ते १० अॅप आस्थापनांकडून ऑनलाईन पूजा, तेल देणे आणि दर्शन घडवले जात होते. प्रत्येक ॲपचे २ लाखांहून अधिक सदस्य असल्याने शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा समोर येऊ शकतो. योग्य तपास व्हावा, याकरता उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार आहे, असे सोनाई येथील ‘शनीसाई प्रतिष्ठान’चे अध्यक्ष विशाल सुरपुरिया यांनी सांगितले.
अॅपवरून नोंदणी, कोट्यवधी रुपये मिळवले !
भक्तांना ऑनलाईन शनीदर्शन घेता यावे म्हणून देवस्थानाने अधिकृतपणे ही सेवा चालू केली होती. त्याचा अपलाभ घेत काहींनी बनावट ‘अॅप’ सिद्ध केले. ऑनलाईन पूजेच्या नावाखाली प्रत्येक सदस्याकडून १ सहस्र ८०० रुपये घेतले जात होते. या बनावट अॅपवर २ ते ३ लाखांहून अधिक सदस्य नोंदणीकृत झाल्याचे दिसून येत आहे. हे घेतलेले शुल्क तिजोरीत जमा न होता परस्पर कामगारांच्या खासगी अधिकोष खात्यात जमा होत असल्याचे तक्रारीत नोंद केले आहे.
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
कोस्टल रोडवरील बोगद्यात चारचाकीला आग; वाहने सोडून लोकांचे पलायन !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
एन्.एम्.एम्.टी.च्या इलेक्ट्रिक बसला आग
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन
सोलापूर येथील वैष्णवी मंदिर परिसरातील महाकाय वटवृक्ष आगीपासून वाचला !