म्हादईचे पाणी कर्नाटकमध्ये वळवू नका !

  • बेळगाव जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमींची कर्नाटकच्या वनमंत्र्यांकडे मागणी

  • म्हादई जलवाटप तंटा

बेळगाव – कळसा-भंडुरा प्रकल्पाच्या माध्यमातून म्हादई नदीचे पाणी कर्नाटकमध्ये वळवू नये, अशी मागणी करणारे निवेदन बेळगाव जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमींनी कर्नाटकचे वनमंत्री ईश्वर खांड्रे आणि बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीष जरकीहोली यांच्याकडे केली आहे. म्हादईचे पाणी कर्नाटकने वळवू नये, यासाठी लढा देणारे कॅप्टन नितीन धोंड आणि त्यांचा गट यांनी दोन्ही मंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. या गटामध्ये ‘पर्यावरणी फाऊंडेशन’ संघटनेचे सदस्य, तिवोळी ग्रामस्थ आणि भीमगड अभयारण्य निर्मितीसाठी कटीबद्ध असलेले नागरिक यांचा समावेश होता.

या निवेदनात पर्यावरणप्रेमींनी म्हणले आहे की, खानापूर तालुक्यातील वनक्षेत्रामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडून मलप्रभा नदीला पाणी मिळते. खानापूर हे दक्षिण भारतातील ‘चेरापुंजी’सारखे (चेरापुंजी हे सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण) आहे. यामुळे कळसा-भंडुरा प्रकल्प न उभारता भीमगड अभयारण्याचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे. या अभयारण्यावर बेळगाव, गडग, नरगुंड, नवलगुंड, रामदुर्ग आदी ठिकाणच्या पाण्याची सुरक्षा अवलंबून आहे. म्हादईचा उगम हा भीमगड अभयारण्यातून होत असतो आणि म्हादई ही भीमगड अभयारण्य अन् तेथील १ सहस्र चौ.कि. क्षेत्रातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील विभाग यांची जीवनदायिनी आहे. यामुळे म्हादईचे पाणी वळवल्यास भंडुरा नाला सुकून त्याचा पर्यावरणावर विपरित परिणाम होणार आहे. तसेच म्हादईचे पाणी वळवल्यास खानापूर येथे सध्या पडत असलेल्या पाऊस पडणार नसून ही हानी कधीही पुढे भरता येणार नाही. यामुळे उत्तर कर्नाटकामध्ये दुष्काळासारखी स्थिती निर्माण होईल.