कर्णावती (गुजरात) येथील संत श्री आसारामजी बापू आश्रमाची भूमी ‘ऑलिंपिक २०३६’साठी संपादित करण्याच्या आदेशाला स्थगिती द्या !

श्री योग वेदांत सेवा समिती, गोवा शाखेची मागणी

पणजी – गुजरात राज्यातील कर्णावती येथील मोटेरा येथील संत श्री आसारामजी बापू यांच्या आश्रमाची पवित्र भूमी आहे. ऑलिंपिक २०३६ प्रकल्पासाठी अनुमाने १ सहस्र कोटी रुपयांची भूमी संपादित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लाखो भक्तांच्या श्रद्धा, शाश्वत संस्कृती आणि अध्यात्माचा जिवंत वारसा असलेली ही भूमी संपादित करण्याच्या आदेशाला स्थगिती द्यावी, अशी मागणी श्री योग वेदांत सेवा समितीच्या गोवा शाखेने केली आहे. याविषयीचे निवेदन समितीच्या वतीने माननीय राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल (गुजरात), मुख्यमंत्री (गुजरात), स्थानिक आमदार, खासदार आणि जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, पूज्य संत श्री आसारामजी बापू यांच्या आश्रमाची भूमी पू. बापूजींचे तपश्चर्या स्थान आहे. देश-विदेशांत रहाणार्‍या लाखो भाविकांसाठी श्रद्धेचे जिवंत केंद्र आहे. सामाजिक सुरक्षा, आपत्कालीन सेवाकार्य, गोरक्षण, पर्यावरण रक्षण आदी विविध कार्ये या आश्रमाकडून केली जातात आणि सामाजातील सर्व घटकांसाठी हे कार्य केले जाते. ही भूमी सामाजिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या अमूल्य आहे. येथे सहस्रो झाडे असल्याने पर्यावरणाचे संतुलनही राखले जाते. या आश्रमाकडून सरकारच्या कोणत्याही अटींचे उल्लंघन केले म्हणून ही कृती केली जात नसून केवळ ऑलिंपिकच्या आयोजनासाठी ही भूमी संपादित केली जात आहे.

आश्रमाची ही भूमी आणि येथून चालणार्‍या सेवांमुळे लाखो लोकांना होणारा लाभ दुर्लक्षित करू शकत नाही. त्यामुळे आमच्या मागणीचा विनंतीपूर्वक विचार करून ही भूमी वाचवण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करावेत, तसेच भूमी वाचवण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करावेत, तसेच भूमी संपादित करण्याचा आदेश त्वरित स्थगित केला जावा.