पर्यटन खात्याच्या अचानक तपासणीत ९९ शॅक्सचालकांनी नियमांचा भंग केल्याचे उघड

खात्याने बजावली कारणे दाखवा नोटीस

(शॅक म्हणजे समुद्रकिनार्‍यावरील तात्पुरते मद्यालय आणि उपाहारगृह)

प्रतिकात्मक छायाचित्र

पणजी, २७ फेब्रुवारी (वार्ता.) – गोवा सरकारच्या पर्यटन खात्याने राज्यातील विविध ठिकाणी समुद्रकिनार्‍यांवरील ‘शॅक्स’ची अचानक तपासणी केली. या तपासणीत उत्तर गोव्यात ८०, तर दक्षिण गोव्यात १९ मिळून एकूण ९९ शॅक्सचालकांकडून ‘गोवा शॅक्स धोरणा’चे उल्लंघन केले जात असल्याचे उघडकीस आले आहे. शॅक्स दुसर्‍याला भाड्याने चालवायला दिल्याचे, तसेच अन्य नियमांचे उल्लंघन केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी खात्याने संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

पर्यटन खात्याच्या अधिकार्‍यांनी सांगितले, ‘‘या प्रकरणी शॅक्सच्या मालकांना लवकरच होणार्‍या सुनावणीच्या वेळी त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे. आतापर्यंत कुणालाही दंड आकारण्यात आलेला नाही. खाते अशा प्रकारे नियमितपणे तपासणी करणार.’’

गोव्यातील शॅक्सवर इडली-सांबार विकण्याचे प्रकार थांबवा ! – मायकल लोबो

मायकल लोबो

गोव्यातील शॅक्सवर इडली-सांबार किंवा महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील अन्नपदार्थ विकण्याचे प्रकार थांबवायला पाहिजेत. शॅक्सवर केवळ गोवा आणि विदेशातील अन्नपदार्थांना प्राधान्य दिले पाहिजे, तसेच ज्या मूळ मालकांनी शॅक्स दुसर्‍यांना अनधिकृतपणे चालवायला दिलेले आहेत, त्यांची अनुज्ञप्ती रहित केली पाहिजे, अशी मागणी कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी केली आहे. ते पुढे म्हणाले, ‘‘सामाजिक माध्यमांवर प्रभाव टाकणारे (इन्फ्ल्यूएन्सर) नव्हे, तर अनधिकृतपणे व्यवहार करणारे शॅक्सचालक गोव्याचे नाव अपकीर्त करत आहेत. गोव्यात विदेशी पर्यटकांची घटती
संख्या ही एक चिंतेची गोष्ट आहे.’’