इंटरनेट पुरवणार्‍या आस्थापनांकडून पणजी शहरातील वीज खात्याने तोडलेल्या केबल पुन्हा जोडण्यास प्रारंभ

वीज खात्याचे कार्यकारी अभियंता काशीनाथ शेट्ये यांना हटवले !

पणजी, २६ फेब्रुवारी (वार्ता.) – वीज खात्‍याने विजेच्‍या खांबांवरील अवैध इंटरनेट केबल्‍स २५ फेब्रुवारी या दिवशी काढण्‍यास प्रारंभ केला आणि या दिवशी ४३ हून अधिक विजेच्‍या खांबांवरील केबल्‍स तोडण्‍यात आल्‍या. त्‍यानंतर २५
फेब्रुवारीला रात्री वीज खात्‍याने त्‍यांचे कार्यकारी अभियंता काशीनाथ शेट्ये यांना या पदावरून हटवल्‍याने २६ फेब्रुवारीला सकाळपासून पुन्‍हा इंटरनेट पुरवणार्‍या आस्‍थापनांकडून तोडलेल्‍या केबल्‍य जोडण्‍यास प्रारंभ झाला आणि त्‍यानंतर
इंटरनेट सेवा पूर्ववत चालू झाली.

‘मुख्‍यमंत्र्यांच्‍या मध्‍यस्‍थीमुळे हा प्रश्‍न तात्‍पुरता सोडवण्‍यात आला’, अशी माहिती ‘ऑल गोवा इंटरनेट सर्व्‍हिस प्रोव्‍हायडर असोसिएशन’चे अध्‍यक्ष सागर गोवेकर यांनी दिली. ते म्‍हणाले, ‘‘मुख्‍यमंत्र्यांनी आम्‍हाला ३ महिन्‍यांत सोपस्‍कार पूर्ण करून काम करण्‍याचे आवाहन केले असून आम्‍ही ते करणार आहोत.’’ याविषयी मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत म्‍हणाले, ‘‘विजेच्‍या खांबांच्‍या साहाय्‍याने नेण्‍यात आलेल्‍या इंटरनेट केबल्‍स ६ महिन्‍यांपर्यंत हटवल्‍या जाणार नाहीत. सरकार भूमीगत केबल टाकणार असून त्‍यात खासगी केबलचालकांना जोडणी देता येणार आहे.’’

विजेच्‍या खांबांवरून इंटरनेट केबल नेण्‍यासाठी वीज खात्‍याकडे भरावे लागणारे शुल्‍क संबंधित इंटरनेट सेवा देणार्‍यांनी भरले नसल्‍याने कोट्यवधी रुपयांची थकबाकी झाली होती. याविषयी खात्‍याकडून संबंधितांना थकबाकी भरण्‍याच्‍या नोटिसा पाठवून आणि वारंवार चेतावणी देऊनही थकित रक्‍कम भरण्‍यात आली नव्‍हती. यामुळे वीज खात्‍याने विजेच्‍या  खांबांवरून जाणार्‍या अशा अनधिकृत केबल्‍स हटवण्‍यास प्रारंभ केला होता; मात्र २५ फेब्रुवारीला कार्यकारी अभियंता काशीनाथ शेट्ये यांना हटवण्‍यात आल्‍याने २६ फेब्रुवारीला केबलचालकांनी पुन्‍हा केबल जोडण्‍यास प्रारंभ केला. सध्‍या वीज खात्‍यानेच या जोडण्‍या तात्‍पुरत्‍या जोडण्‍यास अनुमती दिली आहे.

मी माझे कर्तव्‍य चोखपणे पार पाडले ! – काशीनाथ शेट्ये

मी माझे कर्तव्‍य चोखपणे पार पाडले आहे. २०० हून अधिक अवैध केबलचालकांना मी नोटीस पाठवली आहे. सरकारकडे माझ्‍यापेक्षा अधिक चांगले अधिकारी असतील. त्‍यामुळे त्‍यांनी मला या उत्तरदायित्‍वातून मुक्‍त केले आहे.