Violation Of  RTI Act : माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन करणार्‍या ३९ अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई !

वसई-विरार महापालिकेतील प्रकार !

वसई – माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन करणार्‍या वसई-विरार महापालिकेचे ३९ अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर माहिती आयोगाने दंडात्मक (शास्ती) कारवाई केली आहे. वेळेत माहिती न देणे, चुकीची आणि अपूर्ण माहिती देणे असे प्रकार त्यांच्याकडून होत होते.

पालिकेचे अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी सातत्याने करण्यात आल्या. या अधिकार्‍यांना माहिती आयोगाकडून दंडात्मक कारवाईलाही सामोरे जावे लागले आहे. यात काही अधिकार्‍यांना दोनदा, तर काहींना तीनदा कारवाईला सामोरे जावे लागले.

‘माहिती अधिकार फेडरेशन’चे पालघर जिल्हाध्यक्ष महेश कदम यांनी माहिती अधिकाराच्या अंतर्गत विचारलेल्या माहितीतून ही माहिती समोर आलेली आहे. यातील सर्वाधिक दंडाची रक्कम २५ सहस्र रुपये आहे, तर न्यूनतम दंड अडीच सहस्र रुपये आहे. ही एकूण रक्कम २ लाख ७६ सहस्र इतकी आहे.

संपादकीय भूमिका

अन्य महापालिकांमध्ये असा प्रकार होत नाही ना, याचीही पडताळणी करायला हवी !