आज वाशी येथे अभिनेता मकरंद अनासपुरे यांचे ‘अनुभवाचे बोल’ या विषयावर मार्गदर्शन !

अभिनेते मकरंद अनासपुरे

तुर्भे – ‘नाम फाऊंडेशन’चे संस्‍थापक तथा सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे हे २५ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ६ वाजता ‘अनुभवाचे बोल’ या विषयावर वाशी येथे महाशिवरात्रीच्‍या कार्यक्रमानिमित्त मार्गदर्शन करणार आहेत. श्री सोमेश्‍वर शिवमंदिर चॅरिटेबल ट्रस्‍टच्‍या वतीने वाशीतील एम्.जी. कॉम्‍प्‍लेक्‍स येथे महाशिवरात्रीच्‍या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे, अशी माहिती माजी नगरसेवक प्रकाश (भाऊ) मोरे यांनी दिली.

या कार्यक्रमामध्‍ये शिवरुद्रयाग यज्ञ आणि महाप्रसाद (भंडारा), गायत्री पाठ यांसह जनजागृती भारुड मंडळ, भारुडसम्राट गोविंद महाराज गायकवाड हे विनोदातून समाजप्रबोधन करणारे भारूड सादर करतील. महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ होणार आहे.

२६ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ५ वाजता शिवलिंग महाभिषेक सोहळा, शिवरूद्रयाग यज्ञ आणि दर्शन सोहळा, सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत महाआरोग्‍य शिबिर आणि रक्‍तदान शिबिर, तसेच सायंकाळी ६ वाजल्‍यापासून महाप्रसाद (भंडारा) होणार आहे. या कार्यक्रमाला वनमंत्री गणेश नाईक, माजी आमदार संदीप नाईक आदी उपस्‍थित रहातील.