राज्यातील विजेच्या खांबांवरील इंटरनेट जोडणीच्या केबल हटवणे चालूच रहाणार

उच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली केबलचालकांना दिलासा नाही.

पणजी, २४ फेब्रुवारी (वार्ता.) – वीज खात्याने विजेच्या खांबांवरून इंटरनेट जोडणीच्या केबल्स टाकल्या जात असल्यावरून संबंधित केबलचालकांना दंड आकारला आहे. केबलचालकांनी वीज खात्याची कोणतीही अनुमती न घेता या केबल विजेच्या खांबांवर चढवल्या होत्या. वीज खात्याच्या या कारवाईला ‘ऑल गोवा इंटरनेट सर्विस प्रोव्हायडर असोसिएशन’ या केबलचालकांच्या संघटनेने उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे. या संघटनेने याचिकेमध्ये वीज खाते विजेच्या खांबांवरील त्यांच्या इंटरनेट जोडणीच्या केबल कापून टाकत असल्याचे सांगून त्यामध्ये हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली होती. या याचिकेवर २४ फेब्रुवारी या दिवशी होणारी सुनावणी उच्च न्यायालयाने पुढे ढकलली असून ती आता १८ मार्च या दिवशी होणार आहे. त्यामुळे केबलचालकांची समस्या वाढली आहे.

याविषयी वीज खाते म्हणाले की, उच्च न्यायालयाने कोणतेही निर्देश न दिल्यामुळे विजेच्या खांबांवरील केबल्सच्या विरोधातील कारवाई चालूच रहाणार आहे आणि केबलचालकांना नोटीस अन् दंड आकारण्याव्यतिरिक्त इतर कुठलीही कठोर कारवाई करण्यात आलेली नाही. केबलचालकांच्या संघटनेने वीज खात्याला विनंती आली केली आहे की, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यांनी विजेच्या खांबांवरील केबल तोडून लाखो ग्राहकांना देण्यात आलेल्या सेवेत खंड पाडू नये. केबलचालक आवश्यक तो दंड भरण्यास आणि नियमांचे पालन करण्यास सिद्ध आहेत; पण त्यासाठी काही कालावधी द्यावा. वीज खात्याने केबलचालकांना विनंती केली आहे की, त्यांनी त्यांच्या केबल्सना वेगळा रंग देऊन त्यांची वेगळी ओळख जपावी, तसेच जिथे शक्य आहे, तिथे भूमीखालून केबल नेण्याचा प्रयत्न करावा. त्याचप्रमाणे जिथे विजेच्या खांबांचा वापर केला आहे, त्याचे शुल्क भरावे.