नागपूर : कुख्यात गुंडाला अटक करतांना जमावाचे मध्यप्रदेश पोलिसांवर आक्रमण !

गुंडानेच नागरिकांना दिली चिथावणी

नागपूर – मध्यप्रदेशातील जबलपूर शहरात २१ पेक्षा अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असलेला कुख्यात गुंड बंडू उपाख्य अंकित पटेल (वय २९ वर्षे) वेष पालटून गेल्या २ महिन्यांपासून नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहात होता. (२ महिने गुंड आपल्याच हद्दीत रहात असूनही पोलिसांना याचा थांगपत्ता कसा लागला नाही ? – संपादक) याविषयी समजल्यावर त्याला अटक करण्याच्या हेतूने साध्या वेशातील मध्यप्रदेश पोलिसांनी टांगा चौकात त्याला घेरले. या वेळी त्याने आरडाओरड करून नागरिकांना एकत्र केले. (‘चोर तो चोर वर शिरजोर’ या वृत्तीचा गुंड ! – संपादक) नागरिकांनी त्या युवकाला साहाय्य करण्याच्या अनुषंगाने पोलीस पथकावरच आक्रमण केले. त्यामुळे पोलीस घाबरले. (पोलीस घाबरत असतील, तर कायदा-सुव्यवस्था टिकवणार कोण ? – संपादक) तेथून जाणार्‍या स्थानिक पोलिसांना हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी अंकित पटेल याला अटक करण्यासाठी मध्यप्रदेश पोलिसांना सहकार्य केले. (दुसर्‍या राज्यांत आरोपीला पकडण्यासाठी जातांना स्थानिक पोलिसांना माहिती द्यावी लागते आणि साहाय्य घ्यावे लागते, अशी कार्यपद्धत असतांना ती पाळली गेली नाही का ? जर स्थानिक पोलीस वेळीच आले नसते, तर कोणता अनर्थ ओढावला असता ? पोलीस प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करायला हवा !  – संपादक)

पोलिसांसमवेत झटापट चालू असतांना अंकित पटेल याच्या पत्नीने एका पोलीस कर्मचार्‍याच्या हाताला चावा घेऊन शिवीगाळ केली. (असा प्रकार करणार्‍या गुंडाच्या पत्नीवरही कारवाई व्हायला हवी ! – संपादक) या प्रकरणी कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंद झालेला नाही. (इतकी मोठी घटना असतांना गुन्हा कसा नोंद करण्यात आला नाही ? – संपादक)