राजकोटावरील छत्रपती शिवरायांच्‍या पुतळ्‍याच्‍या निर्मितीवर मुख्‍यमंत्री कार्यालयातून लक्ष ठेवले जाणार !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई, १९ फेब्रुवारी (वार्ता.) – मालवणमधील राजकोटावर उभारण्‍यात येणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या पुतळ्‍याच्‍या निर्मितीवर थेट मुख्‍यमंत्री कार्यालयातून लक्ष ठेवले जात आहे. येथे शिवसृष्‍टीचीही निर्मिती केली जाणार आहे. याविषयी आराखडा सिद्ध करण्याचे काम चालू आहे, अशी माहिती दैनिक ‘सनातन प्रभात’ला प्राप्त झाली आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये राजकोटावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. त्यानंतर राज्यशासनाकडून येथे नवीन पुतळ्याची निर्मिती करण्याची घोषणा केली. ज्येष्ठ शिल्‍पकार राम सुतार यांच्या ‘सुतार आर्ट क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड’ आस्थापनेला काम देण्यात आले आहे. ६० फूट उंचीचा पुतळा उभारण्यात येणार आहे.

मत्‍स्‍यव्‍यवसाय अन् बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांच्‍या हस्‍ते शिवजयंतीच्‍या निमित्ताने राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या पुतळ्‍याच्‍या निर्मितीची पायाभरणी करण्‍यात आली. याविषयी नीतेश राणे म्‍हणाले की, पुतळा कधीपर्यंत उभारणार ? यापेक्षा तो दर्जेदार व्‍हावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कारण उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा वर्षानुवर्षे रहाणार आहे. त्यामुळे तो दर्जेदार असणे आवश्यक आहे.’’