Mahakumbh Snan : माघ पौर्णिमेला त्रिवेणी संगमावर २ कोटी भाविकांनी केले स्नान !

इयत्ता ८ वीपर्यंतच्या शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद !

प्रयागराज (उत्तरप्रदेश), १३ फेब्रुवारी (वार्ता.) – महाकुंभात त्रिवेणी संगम घाटावर माघ पौर्णिमेला सायंकाळी ६ वाजेपर्यंत २ कोटी ४ लाख भाविकांनी स्नान केले. गर्दी लक्षात घेता प्रयागराज येथे १३ ते १५ फेब्रुवारी हे तीन दिवस इयत्ता ८ वीपर्यंतच्या शाळा बंद रहातील; पण अभ्यास ऑनलाईन चालू असेल. महाकुंभमेळ्यातून गर्दी अल्प होण्यासाठी म्हणून लेटे हनुमान मंदिर, अक्षय्यवट आणि डिजीटल महाकुंभ केंद्र बंद ठेवण्यात आले होते; मात्र आता प्रशासनाने लेटे हनुमान अन् अक्षय्यवट यांचे दर्शन चालू केले आहे. महाकुंभात कल्पवासाची सांगता झाली आहे. संगम स्नानानंतर अनुमाने १० लाख कल्पवासी येथून घरी परतत आहेत.

प्रयागराजमध्ये वाहतूक सुरळीत असून प्रवासी कोणत्याही अडथळ्याविना संगम स्नान करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व प्रमुख मार्गांवर वाहतूक सुरळीत झाली आहे. प्रशासनाने केलेल्या व्यापक बंदोबस्ताचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. प्रयागराजमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी झाली असली, तरी प्रशासनाच्या चोख बंदोबस्तामुळे वाहतूक नियंत्रणात आहे. यामुळे भाविक संगमावर सहज पोचून पवित्र स्नान करत आहेत.