Nashik Kumbh Invitation At Prayagraj : प्रयागराज येथे लागले नाशिक येथील सिंहस्थ कुंभपर्वाचे निमंत्रण देणारे फलक !

प्रयागराज कुंभपर्व २०२५

इंग्रजी भाषेत फलक !

प्रयागराज येथील महाकुंभक्षेत्री ठिकठिकाणी लावण्यात आलेले नाशिक येथे होणार्‍या कुंभपर्वाचे फलक

प्रयागराज, १३ फेब्रुवारी (वार्ता.) – प्रयागराज येथे सध्या चालू असलेल्या महाकुंभक्षेत्री नाशिक येथे सप्टेंबर २०२७ मध्ये होणार्‍या सिंहस्थ कुंभपर्वाचे निमंत्रण देणारे मोठे फलक ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या वतीने हे फलक लावण्यात आले आहेत.

एरव्ही कुंभपर्वाच्या कुठल्याही फलकावर साधू शंखनाद करतांनाचे छायाचित्र असायचे. यंदा प्रथमच या फलकावर एका वृद्ध महिलेचे हात जोडून नमस्कार करतांनाचे छायाचित्र छापण्यात आले आहे. यासह त्याच्या अवतीभोवती मंदिरे, भगवे ध्वज, नदी आणि स्नान करतांना साधू यांचे चित्र आहे. विशेष म्हणजे हा फलक इंग्रजी भाषेत आहे. या फलकावर मोठ्या अक्षरात ‘अ लार्जर देन लाईफ मिस्टिकल एक्सपीरियन्स अवेट्स : नाशिक कुंभ’ (जीवनाच्या गूढ अनुभवाची वाट पहा ! : नाशिक कुंभ) असे लिहिण्यात आले आहे. त्याखाली ‘त्र्यंबकेश्‍वर आणि पंचवटी, नाशिक, जुलै २०२७’ असे लिहिण्यात आले आहे. हे फलक सध्या प्रयागराजमध्ये चर्चेचा विषय ठरले आहेत.