(कुंभमेळ्यात साधारण महिनाभर भाविकांकडून संगमस्नानी व्रत करण्यात येते. ते व्रत करणार्यांना ‘कल्पवासी’ असे म्हटले जाते.)

प्रयागराज, १२ फेब्रुवारी (वार्ता.) – कुंभमेळ्यात आलेल्या लाखो कल्पवासियांचे माघ पौर्णिमेला कल्पवासाचे व्रत पूर्ण झाले. त्यामुळे मागील महिनाभर कुंभमेळ्यात राहून साधनारत असलेल्या लाखो कल्पवासींनी पहाटेपासून त्रिवेणी संगम आणि गंगा घाट यांवर येऊन मनोभावे पूजाअर्चा केली आणि त्रिवेणी संगम अन् गंगा घाट यांवर पर्व स्नान केले.
११ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजता माघी पौर्णिमेला प्रारंभ झाला. त्यामुळे पर्व स्नानाचा लाभ घेण्यासाठी ११ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजल्यापासून भाविकांनी पर्व स्नानाला प्रारंभ केला. रात्रभर लाखो भाविकांनी पर्व स्नान केल्यामुळे सकाळी भाविकांची गर्दी नियंत्रणात आली. अमृत स्नानपूर्ण झाल्यामुळे पर्व स्नानाला आखाड्यांचे प्रतिनिधी आणि साधू स्नानासाठी नव्हते. त्यामुळे पोलिसांनी त्रिवेणी संगमावर भाविकांना स्नानासाठी सोडले. स्नान करणार्यांमध्ये महिला, वृद्ध आणि बालक यांचे प्रमाणही अधिक होते.
कुंभक्षेत्रात वाहनबंदीमुळे संगम मार्गावरील गर्दी नियंत्रित !
पर्व स्नानाच्या पार्श्वभूमीवर ११ फेब्रुवारीच्या रात्री ८ पासून प्रशासनाने कुंभक्षेत्रात वाहनबंदीचा आदेश काढला. केवळ अत्यावश्यक वाहनांना कुंभक्षेत्रात प्रवेश देण्यात येत होता. त्यामुळे पोलिसांना कुंभक्षेत्रातील गर्दी नियंत्रित करता आली.