Prayagraj Kumbh Parva 2025 : कुंभमेळ्यातील वाढत्या गर्दीमुळे रेल्वेच्या आरक्षित डब्यांतही प्रवाशांची तुडुंब गर्दी !

प्रयागराज कुंभपर्व २०२५

भाविकांच्या प्रचंड संख्येमुळे रेल्वे गाड्याही अपुर्‍या ठरत आहेत !

प्रयागराज (उत्तरप्रदेश), ११ फेब्रुवारी (वार्ता.) : कुंभमेळ्यातील वाढत्या गर्दीमुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. भाविकांची गर्दी इतकी वाढली आहे की, फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत सर्व गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे. भाविकांच्या प्रचंड संख्येमुळे रेल्वे गाड्याही अपुर्‍या ठरत आहेत. भाविकांना जाण्यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्या चालू करूनही प्रवाशांची गर्दी वाढतच आहे.

रेल्वेगाड्यांमध्ये झालेली भाविकांची प्रचंड गर्दी !

कुंभक्षेत्रातून निघणार्‍या प्रवाशांची गर्दी इतकी वाढली आहे की, सामान्य डब्यांचे तिकिट काढूनही रेल्वेत चढता येत नसल्यामुळे ते प्रवाशी वातानुकूलित आणि स्लीपर डब्यांतून प्रवास करत आहेत. गर्दीची कल्पना नसल्यामुळे अनेक भाविकांना रेल्वेस्थानकावर वेळेत पोचता न आल्याने गाडी सुटून जाण्याचे प्रकारही घडत आहेत.

डब्यांची स्थिती आयत्या वेळी दाखवल्याने प्रवाशांची धावपळ !

रेल्वे ही फलाटावर लागण्याच्या काही मिनिटे आधीच डब्यांची उभारण्याची स्थिती प्रदर्शित केली जात आहे. त्यामुळे फलाटावर लवकर येऊनही आरक्षणाचा डबा नेमका कुठे येणार ? हे प्रवाशांना कळत नाही. आयत्या वेळी गर्दीतून साहित्य घेऊन आरक्षित डब्यापर्यंत जाणे कर्मकठीण झाले आहे. त्यात वृद्ध, बालके आणि महिला असल्यास अल्प वेळेत साहित्य घेऊन गर्दीतून डब्यापर्यंत जाणे, हे मोठे जिकरीचे झाले आहे.

हमालांकडून प्रवाशांची लूट !

उत्तरप्रदेशाच्या विविध रेल्वेस्थानकांवर प्रवाशांचे साहित्य रेल्वेच्या डब्यापर्यंत नेण्यासाठी हमाल अवाच्या सव्वा पैसे आकारत आहेत. ७-८ बॅगा नेण्यासाठी ३ सहस्र रुपयांहून अधिक हमाली घेतली जात आहे.