सकल मराठा समाजाच्या वतीने राहुल सोलापूरकरला ‘जोडे मारा’ आंदोलन

अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी क्षमा मागितली, तरी त्यांना जिल्ह्यात प्रवेशबंदी ! – सीताराम गावडे

सावंतवाडी – अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आगरा येथून सुटकेच्या प्रसंगाविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. याचे तीव्र पडसाद तळकोकणातही उमटले आहेत. सावंतवाडी येथे सोलापूरकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. भारतात रहायचे असेल, तर शिवरायांचा आदर राखावा लागेल, अन्यथा त्यांनी पाकिस्तानात जावे. त्यांनी क्षमा मागितली असली, तरी त्यांना सोडणार नाही. ‘आज फलक तुडवला, उद्या प्रत्यक्षही तुडवू’, अशी चेतावणी सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांनी दिली.

सावंतवाडी येथील राजा शिवछत्रपती चौक येथे अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात आले. या वेळी उपस्थितांनी राहुल सोलापूरकर यांच्या फलकावर जोडे मारत त्यांची प्रतिमा पायाखाली तुडवली. त्यांच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. सीताराम गावडे म्हणाले, ‘‘राहुल सोलापूरकर यांनी सिंधुदुर्गात प्रत्यक्ष दौरा केला, तर त्यांच्या तोंडाला काळे फासू. त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून हे विधान केले आहे, ते सांगायला हवे. भारतात राहून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन करणार नाही. त्यांना सोडणार नाही.’’

काय म्हणाले होते राहुल सोलापूरकर ?

एका मुलाखतीमध्ये राहुल सोलापूरकर म्हणाले होते की, महाराज आगर्‍याहून सुटले, ते मिठाईचे पेटारे वगैरे काही नव्हते. महाराज चक्क लाच देऊन परत आले होते. औरंगझेबाचा वजीर आणि त्याची पत्नी या दोघांनाही महाराजांनी लाच दिली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात सोलापूरकर यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली.