Sanatan Prabhat Exclusive : मंदिरे सरकारीकरणापासून मुक्त करण्याची संतांची मागणी सरकारने गांभीर्याने घ्यावी ! – खासदार पू. साक्षी महाराज, भाजप

पू. साक्षी महाराज

प्रयागराज, २५ जानेवारी (वार्ता.) – हिंदूंची मंदिरे सरकारीकरणापासून मुक्त व्हावीत, अशी सर्व संतांची मागणी आहे. स्थानिक पातळीपासून संसदेपर्यंत भाजप सत्तेत येण्यामध्ये संतांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे मंदिरे सरकारीकरणापासून मुक्त करण्याची संतांची मागणी सरकारने गांभीर्याने घ्यावी, असे मत भाजपचे खासदार पू. साक्षी महाराज यांनी व्यक्त केले. महाकुंभमेळ्यामध्ये ‘सनातन प्रभात’ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये पू. साक्षी महाराज यांनी वरील मत व्यक्त केले.

या वेळी ‘वक्फ बोर्डा’विषयी विचारलेल्या प्रश्‍नावर पू. साक्षी महाराज म्हणाले, ‘‘वक्फ मंडळ रहित करण्यात यावे, अशी मागणी केवळ संत नव्हे, तर मुसलमानांकडूनही केली जात आहे. वक्फ मंडळ म्हणजे हिंदूंच्या मालमत्तेवर डल्ला आहे. वक्फ कायदा रहित करण्यासाठी संसदेमध्ये विधेयक मांडण्यात आले असून चर्चेकरता ते संयुक्त समितीकडे पाठवण्यात आले आहे. संसदेच्या येत्या अधिवेशनात याविषयी निर्णय होण्याची शक्यता आहे.’’

भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित केले गेले नाही, ही चूक !

भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याविषयी विचारलेल्या प्रश्‍नावर पू. साक्षी महाराज म्हणाले, ‘‘भारत स्वतंत्र झाल्यावर मुसलमानांनी स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केली. भारताची विभागणी जर धर्माच्या आधारे झाली, तर उर्वरित देश हिंदूंचा असायला हवा होता. पाकिस्तानची निर्मिती झाली, तेव्हाच भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करणे आवश्यक होते. ही चूक त्वरित दुरुस्त करायला हवी. भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी संत आवाज उठवत आहेत.’’