देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमात पोळ्‍या करण्‍याची सेवा करतांना साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे !

कु. विद्या गरुड

१.  पोळ्‍या करण्‍याच्‍या सेवेला उशिरा येऊनही सेवा वेळेआधी पूर्ण होणे 

‘सध्‍या माझ्‍याकडे आश्रमात सकाळी पोळ्‍या बनवण्‍याची सेवा आहे. मला ही सेवा करतांना पोळ्‍यांच्‍या संख्‍येनुसार अल्‍पाधिक कालावधी लागतो. पोळ्‍या करण्‍याच्‍या सेवेच्‍या अंतर्गत कणिक मळणे, २० ते ३० पोळ्‍या करणे, सर्व आवरणे आणि भांडी घासणे, या सर्व कृती करायला अनुमाने ५० मिनिटे ते १ घंटा, इतका वेळ लागतो.

८.८.२०२२ या दिवशी मला सेवेसाठी यायला १० मिनिटे उशीर झाला. मला १७ पोळ्‍या करायच्‍या होत्‍या. त्‍या दिवशी ही सेवा ४० मिनिटांत पूर्ण झाली. मी सेवेला उशिरा येऊनही माझी सेवा वेळेआधी पूर्ण झाली.

‘मी या सेवेला उशिरा आले’, या चुकीविषयी मी चिंतन करत होते. तेव्‍हा ‘स्‍वतःची खरी कार्यक्षमता कशी ओळखावी ?’, याविषयी माझ्‍याकडून झालेले चिंतन येथे दिले आहे.

२. ‘स्‍वतःची कार्यक्षमता कशी ओळखावी ?’ याविषयी झालेले चिंतन

२ अ. आपली खरी कार्यक्षमता अडचणीच्‍या प्रसंगात लक्षात येते.

२ आ. सेवेची गती वाढणे : सेवेला यायला उशिर झालेला असतो. तेव्‍हा सेवेसाठी कालावधी अल्‍प असल्‍याने आपल्‍या मनात अन्‍य कोणतेच विचार येत नाहीत. परिणामी आपली सेवेत एकाग्रता साधली जाऊन सेवेची गती वाढते किंवा सेवा अल्‍प कालावधीत पूर्ण करायची असतांना आपली सेवेची गती वाढते.

३. शरणागतीने आणि आर्ततेने प्रार्थना केल्‍याने देवाचे साहाय्‍य मिळणे 

‘सेवा अल्‍प कालावधीत परिपूर्ण करणे आपल्‍याला शक्‍य नाही’, हे लक्षात आल्‍याने साधक देवाला शरणागतीने आणि आर्ततेने प्रार्थना करतो. तेव्‍हा देवाचे साहाय्‍य मिळाल्‍याने सेवा अल्‍प वेळेत आणि परिपूर्ण होऊन साधकाची साधना होते.

४. दैवी विचार अन् वातावरणातील चैतन्‍य ग्रहण करता येणे 

त्‍या वेळी मनात कर्तेपणा, तसेच अन्‍य कोणतेही विचार नसल्‍याने स्‍वतःवर त्रासदायक शक्‍तींचे आवरण येत नाही आणि दैवी विचार अन् वातावरणातील चैतन्‍य ग्रहण करता येते.

५. कृती भावाच्‍या स्‍तरावर होत असल्‍याने ती चांगली होते.’

अशा प्रकारे अभ्‍यास केला, तर आपण आपली कार्यक्षमता आणि फलनिष्‍पत्ती वाढवू शकतो.’

– कु. विद्या विलास गरुड, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (८.८.२०२२)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक