धारगळ, पेडणे येथे ‘सनबर्न’च्या आयोजनावरून पेडणे तालुक्यात २ गट

विरोधक आणि समर्थक यांच्या बैठका

पेडणे, १ डिसेंबर (वार्ता.) – धारगळ येथे सनबर्न महोत्सवाच्या आयोजनावरून पेडणे भागात विरोधक आणि समर्थक, असे २ गट निर्माण झाले असून या दोन्ही गटांनी आपापल्या बैठका आयोजित केल्या आहेत. सनबर्नला अनुमती देऊ नये, अशा आशयाचे पत्र आम आदमी पक्षाच्या पेडणे येथील शाखेकडून पंचायतीला देण्यात आले आहे. धारगळ पंचायतीसमोर ‘सनबर्न’च्या विरोधात एकत्र येण्यासाठी आवाहन करण्यात आल्यानंतर पोलिसांनी कलम १६८ अंतर्गत काही जणांना नोटीस बजावली आहे. पोलिसांच्या या कृतीविषयी लोकांनी प्रसन्नता व्यक्त केली आहे. अनुमती मिळाली नसतांना आयोजकांनी सिद्धता चालू केल्याने अनेकांनी सरकारच्या भूमिकेवर प्रसन्नता  व्यक्त केली आहे. पेडणे तालुक्यातील २ आमदार पेडणेचे भाजपचे प्रवीण आर्लेकर आणि मगोचे जीत आरोलकर यांनी आम्ही नागरिकांसमवेत रहाणार, असे पूर्वीच घोषित केले आहे. धारगळ या भागात रुग्णालये आहेत. त्यामुळे तिथे ‘सनबर्न’च्या आयोजनाला अनुमती देणे योग्य नाही, अशी भूमिका अनेकांनी घेतली असतांना ‘सनबर्न’च्या समर्थनार्थ एक गट उभा ठाकला आहे. ‘सनबर्न’मुळे व्यवसायाला चालना मिळेल, असे त्यांचे म्हणणे आहे. २ दिवसांपासून या विषयावर पेडणे येथे जागोजागी चर्चा चालू आहे.

‘सनबर्न’च्या आयोजनावरून भाजपचे आमदार प्रवीण आर्लेकर यांची चेतावणी

सनबर्नच्या धारगळमधील आयोजनाला विरोध दर्शवतांना भाजपचे आमदार प्रवीण आर्लेकर म्हणाले, ‘‘केवळ धारगळमध्ये नव्हे, तर पूर्ण पेडणे तालुक्यात आम्हाला ‘सनबर्न’ नको आहे. मला विश्वासात न घेता धारगळमध्ये ‘सनबर्न’चे आयोजन करण्याचा प्रयत्न होत आहे. सत्तेत असूनही प्रत्येक वेळी मला लोकांसमवेत रस्त्यावर उतरावे लागत आहे. धारगळमध्ये सनबर्न होणार नाही.

२ डिसेंबर या दिवशी होणार्‍या पंचायतीच्या बैठकीत ‘सनबर्न’ला अनुमती दिल्यास मी आत घुसून काय ते दाखवून देईन.’’