अब्‍दुल सत्तार यांच्‍या विरोधात फौजदारी याचिका

निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्‍याचे प्रकरण

अब्‍दुल सत्तार

छत्रपती संभाजीनगर – येथे माजी मंत्री आणि आमदार अब्‍दुल सत्तार यांनी निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्‍याच्‍या प्रकरणी सिल्लोड न्‍यायालयात फौजदारी याचिका प्रविष्‍ट करण्‍यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली आणि पुणे येथील डॉ. अभिषेक हरिदास यांनी अब्‍दुल सत्तार यांच्‍या नामनिर्देशन पत्रासोबत सादर केलेल्‍या शपथपत्रावर मतदानापूर्वीच लेखी आक्षेप सादर केला होता; मात्र या आक्षेपावर निवडणूक आयोगाने अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही. विधानसभा २०२४ च्‍या निवडणुकीत सिल्लोड येथे अब्‍दुल सत्तार त्‍यांचे प्रतिस्‍पर्धी सुरेश बनकर यांच्‍या विरोधात २ सहस्र ४२० मतांनी निवडून आले आहेत. सिल्लोड न्‍यायालयात या २ याचिका आल्‍यामुळे सत्तार यांच्‍या अडचणीत पुष्‍कळ वाढ होतांना दिसत आहे.

महेश शंकरपेल्ली यांनी अब्‍दुल सत्तार यांच्‍या निवडणूक शपथपत्रात १६ चुका असल्‍याचे सांगत त्‍यांची उमेदवारी रहित करण्‍याची मागणी केली आहे. सत्तार यांनी शपथपत्रात मालमत्तेविषयी चुकीची माहिती दिली असून प्रत्‍यक्ष मालमत्ता आणि दिलेल्‍या मालमत्तेचा तपशील यांत तफावत असल्‍याचा आरोप त्‍यांच्‍यावर आहे.